हैदराबाद: आयपीएल 2025 च्या हंगामातील 41 वा सामना आज मुंबई इंडियन्स आणि सनरायजर्स हैदराबाद या संघांमध्ये खेळला जाणार आहे. हैदराबादच्या राजीव गांधी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर आज संध्याकाळी 7.30 वाजता हा सामना सुरू होईल. सामन्याकडे क्रिकेट रसिकांच्या नजरा लागून आहेत. दोन्ही संघांसाठी हा सिझन तितकासा चांगला राहिलेला नाही, दोन्ही संघ आज विजयासाठी प्रयत्नशील असतील.
कुणाचं पारडं जड?
आयपीएल 2025 च्या सीझनमध्ये मुंबई इंडियन्स असो वा सनरायजर्स हैदराबाद दोन्ही संघांना चांगली कामगिरी करण्यात सातत्याने अपयश आले आहे. मुंबई इंडियन्सच्या संघाने या मोसमात 8 सामने खेळले असून पैकी 4 सामने जिंकले आहेत. मुंबईच्या संघांकडे सध्यस्थितीला 8 गुण असून संघ गुणतालिकेत 6 व्या स्थानावर आहे. संघांचा नेट रन रेट चांगला आहे.

दुसरीकडे सनरायजर्स हैदराबाद संघाची अवस्था केविलवाणी असल्याचे चित्र आहे. संघाने या मोसमात 7 सामने खेळले असून पैकी अवघे 2 सामने संघाला जिंकता आले आहेत. हैदराबादच्या संघाकडे 4 गुण असून संघ गुणतालिकेत 9 व्या स्थानावर आहे. तसेच संघाचा नेट रन रेट देखील अत्यंंत खराब असल्याचे चित्र आहे.
मुंबई इंडियन्सला आजचा सामना जिंकत आयपीएलमधील आपले आव्हान कायम ठेवण्याची संधी असणार आहे. दोन्ही संघांमधील शेवटच्या 24 सामन्यांचा वपिचार केला असता त्यापैकी मुंबई इंडियन्सने 14 तर सनरायजर्स हैदराबादने 10 सामने जिंकले आहेत. एकंदरीत मुंबईचं पारडं जड मानलं जात आहे. तसेच आजचा सामना देखील मुंबई इंडियन्स जिंकेल, असं मत जाणकारांचं आहे.
मुंबई आणि हैदराबादचे प्लेयिंग इलेव्हन
अभिनव मनोहर, अनिकेत वर्मा, ट्रेविस हेड, अभिषेक शर्मा, हेनरीच क्लासन यांच्यावर सनरायजर्स हैदराबादच्या फलंदाजीची जबाबादारी असेल, तर कॅप्टन पॅट कमिन्स, मोहम्मद शमी, हर्षल पटेल यांना हैदराबादच्या गोलंदाजीची धुरा सांभाळावी लागणार आहे.
मुंबई इंडियन्सचा कॅप्टन हार्दीक पांड्याच्या नेतृत्वात संघाचे पुनरागमन पाहायला मिळत आहे. रोहित शर्मा, तिलक वर्मा, सुर्यकुमार यादव यांसारखे गुणवत्ता असणारे फलंदाज मुंबईच्या संघाकडे आहेत. तर गोलंदाजीत जसप्रीत बुमरा, करण शर्मा, दिपक चाहर यांच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल.