सांगलीच्या पैलवानाने वस्ताद बदलला! डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील अखेर आज शिंदेंच्या सेनेत प्रवेश करणार

यापूर्वी त्यांनी मंत्री उदय सामंत यांची रत्नागिरीत भेट घेतली होती. तेव्हापासूनच पैलवान चंद्रहार पाटील हे शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा होती. मात्र आता प्रवेशावर शिक्कामोर्तब झाले असून, सोमवारी शिंदे गटात प्रवेश करणाहेत.

Chandrahar Patil : राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर येत आहे. ठाकरे गटाला लागलेली गळती काही थांबायचे नाव घेत नाही. ठाकरे गटातून लोकसभा निवडणूक लढवलेले डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील हे अखेर शिंदे यांच्या शिवसेनेत आज (सोमवारी) प्रवेश करणार आहेत. लोकसभा निवडणुकीपूर्वी चंद्रहार पाटील यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. पाटील यांनी सांगली लोकसभा मतदारसंघातून ठाकरेंच्या सेनेकडून निवडणूक लढवली होती, पण त्यांचा पराभव झाला होता. यानंतर ते आता शिंदेंच्या सेनेत प्रवेश करणार आहेत. याबाबत पाटील यांनी सोशल मीडियावरुन या निर्णयाची माहिती दिली आहे.

अनेक दिवसांपासून प्रवेशाच्या चर्चा…

दरम्यान, गेल्या आठवड्यात मंत्री संजय शिरसाठ यांच्याकडून चंद्रहार पाटील हे आमच्याकडे येतात, अशी माहिती समजली होती. यानंतर ते अखेर सोमवारी एकनाथ शिंदे गटात पक्षप्रवेश करणार आहेत. संजय शिरसाठ यांच्या दाव्याबाबत आपण आता काय बोलणार नाही. योग्य वेळी निर्णय घेऊ, असं पाटील यांनी म्हटले होते. दरम्यान, यापूर्वी त्यांनी मंत्री उदय सामंत यांची रत्नागिरीत भेट घेतली होती. तेव्हापासूनच पैलवान चंद्रहार पाटील हे शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा होती. मात्र आता प्रवेशावर शिक्कामोर्तब झाले असून, सोमवारी सांगलीचा पैलवानाने वस्ताद बदलणार आहे.

एक्सवरून दिली माहिती…

दुसरीकडे शिंदे गटातील प्रवेशाची माहिती पैलवान चंद्रहार पाटील यांनी एक्स अकाउंटवरून एक पोस्ट करत दिली आहे. त्यामुळे चंद्रहार पाटील हे ठाकरेंची साथ सोडून शिंदेंच्या गोटात दाखल होणार आहेत. “राज्यातील क्रीडा क्षेत्रामध्ये काम करत असताना, बऱ्याच अडचणी त्रुटी गैरकारभार मी अनुभवलेले आहेत. अशा बाबींविरोधात मी वेळोवेळी आवाज देखील उठवला आहे. परंतु प्रत्यक्ष शासन सहभागाशिवाय असे प्रश्न मार्गी लागणे कठीण आहे. म्हणून क्रीडा क्षेत्रात सुसूत्रता आणण्यासाठी व सामाजिक राजकीय क्षेत्रात काम करण्यासाठी मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी सरकारसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे”, अशी पोस्ट करत प्रवेशाची माहिती दिली आहे.


About Author

Astha Sutar

Other Latest News