भारताच्या रिले संघाने इतिहास रचला, विक्रमी वेळेत चीनला हरवून सुवर्णपदक जिंकले

आशियाई चॅम्पियनशिपमध्ये मिक्स रिले प्रकारातील भारताचे हे तिसरे पदकविजय आहे. याआधी भारताने २०२३ मध्ये गोल्ड आणि २०१९ मध्ये सिल्व्हर मेडल जिंकले होते.

Asian Athletics Championships 2025 : भारताने आशियाई अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिप २०२५ मध्ये ४x४०० मीटर मिक्स रिलेचे विजेतेपद पुन्हा एकदा आपल्या नावावर केले आहे. ही शर्यत आज बुधवारी दक्षिण कोरियाच्या गुमी शहरात पार पडली. भारतीय संघामध्ये रूपल चौधरी, संतोष कुमार तमिलरासन, विशाल टीके आणि शुभा वेंकटेशन यांचा समावेश होता. त्यांनी ३ मिनिटे १८.१२ सेकंदात रेस पूर्ण करत गोल्ड मेडल जिंकले.

मिक्स रिले प्रकारातील भारताचे हे तिसरे पदक

आशियाई चॅम्पियनशिपमध्ये मिक्स रिले प्रकारातील भारताचे हे तिसरे पदकविजय आहे. याआधी भारताने २०२३ मध्ये गोल्ड आणि २०१९ मध्ये सिल्व्हर मेडल जिंकले होते. २०१९ मध्येच या इव्हेंटची सुरुवात झाली होती.

संतोषने पहिली धाव पूर्ण करत भारताला आघाडी मिळवून दिली आणि बॅटन रूपलकडे दिले. रूपलने चीनच्या धाविकेला जोरदार टक्कर दिली आणि आघाडी कायम राखली. त्यानंतर तिने बॅटन विशालकडे सुपूर्त केले. विशालने सुरुवातीचा दबाव झेलत भारताची आघाडी अधिक मजबूत केली. शेवटी शुभाने शानदार पद्धतीने शर्यत पूर्ण करत भारताला सुवर्णपदक मिळवून दिले. चीनने ३:३०.५२ सेकंदात रेस पूर्ण करत रौप्यपदक मिळवले आणि श्रीलंकेने ३:२१.९५ सेकंदात रेस पूर्ण करत कांस्यपदक पटकावले.

रूपलने भारतासाठी इतिहास रचला

रूपलने बुधवारी वैयक्तिक महिला ४०० मीटर शर्यतीत रौप्यपदक जिंकले. रूपलशिवाय पूजाने (१५०० मीटर) रौप्यपदक पटकावले, तर युनुस शहानं पुरुष १५०० मीटर शर्यतीत कांस्यपदक आपल्या नावावर केले. रूपलने २०२२ मध्ये जागतिक अंडर-२० अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये दोन पदके जिंकणारी पहिली भारतीय अ‍ॅथलीट बनून इतिहास रचला होता. त्यावेळी तिने ४x४०० मीटर रिलेमध्ये रौप्य आणि महिला ४०० मीटर शर्यतीत कांस्य पदक पटकावले होते.

दरम्यान, बहुतांश वेळा अमेरिकेत राहणारा तेजस्विन शंकर भारतासाठी रौप्य पदक जिंकणाऱ्यांमध्ये सामील झाला. तेजस्विनने १० स्पर्धांचा डेकाथलॉन प्रकारात ७६१८ गुण मिळवत दुसरा क्रमांक पटकावला. तो चीनच्या फेई शियांग (७६३४) याच्यापाठोपाठ आणि जपानच्या केइसुके ओकुडा (७६०२) याच्यापुढे होता.
प्रवीण चित्रवेलने पुरुष त्रिकूद प्रकारात १६.९० मीटरच्या प्रयत्नाने रौप्यपदक जिंकले.


About Author

Rohit Jernavare

Other Latest News