यशस्वी जैस्वालनं इतिहास रचला, इंग्लंडविरुद्धच्या पहिल्याच कसोटीत ठोकलं शतक, दिग्गजांच्या यादीत झाली एन्ट्री

टीम इंडियाचा युवा सलामीवीर यशस्वी जैस्वाल याने इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात शानदार शतक झळकावले आहे. त्याने आपल्या कसोटी कारकिर्दीतील हे पाचवे शतक फक्त 144 चेंडूंमध्ये पूर्ण केले. या कामगिरीमुळे तो इंग्लंडच्या भूमीवर पहिल्याच डावात शतक झळकावणारा पाचवा भारतीय फलंदाज ठरला आहे. त्याच्याआधी विजय मांजरेकर, संदीप पाटील, सौरव गांगुली आणि मुरली विजय यांनी ही कामगिरी केली होती.

विजय मांजरेकर हे इंग्लंडमध्ये खेळताना पहिल्याच डावात शतक करणारे पहिले भारतीय ठरले होते. त्यांनी 1952 मध्ये 133 धावांची खेळी खेळली होती. त्यानंतर संदीप पाटील, सौरव गांगुली आणि मुरली विजय यांनीही पहिल्याच डावात शतक ठोकले. यशस्वी जायसवालने याआधी आपल्या कसोटी पदार्पणात वेस्ट इंडीजविरुद्ध 171 धावांची जबरदस्त खेळी करून शतक झळकावले होते.

केएल राहुलसोबत 91 धावांची दमदार सलामी

भारत विरुद्ध इंग्लंड पहिल्या कसोटीबाबत बोलायचे झाल्यास, जैस्वालने केएल राहुलसोबत 91 धावांची दमदार सलामी भागीदारी केली. राहुल 42 धावांवर बाद झाला. त्यानंतर शुभमन गिलसोबतही जायसवालने 129 धावांची भागीदारी करत भारताचा डाव मजबूत केला. जायसवालने इंग्लंडमधील पहिल्याच डावात 101 धावा केल्या, ज्यात त्याने 16 चौकार आणि 1 षटकार ठोकले.

लवकरच कसोटीत 2 हजार धावा पूर्ण करणार

यशस्वी जायसवाल आता कसोटी क्रिकेटमध्ये 2,000 धावा पूर्ण करण्यापासून फक्त 101 धावांवर आहे. त्याने आतापर्यंत 37 कसोटी डावांमध्ये 1,899 धावा केल्या आहेत. लीड्समध्ये सुरू असलेल्या सामन्याच्या दुसऱ्या डावात शतक ठोकल्यास तो 2,000 धावा पूर्ण करणारा आणखी एक भारतीय ठरेल. सध्या सर्वात वेगाने 2,000 कसोटी धावा पूर्ण करण्याचा विक्रम राहुल द्रविडच्या नावावर आहे, ज्याने 40 डावांमध्ये हा टप्पा गाठला होता.


About Author

Jitendra bhatavdekar

Other Latest News