आयपीएलमध्ये विदेशी खेळाडूंच्या अनुपस्थितीमुळे संघ चिंतेत पडले आहेत. कारण, पुढे कसं होणार? काय रणनिती आखायची असे प्रश्न संघांसमोर निर्माण झाले आहेत. विदेशी खेळांडूंची जागा कोणाला द्यायची, यावर सध्या मंथन सुरू आहे. परंतु, भारतीय उगवत्या क्रिकेटर्ससाठी ही मोठी संधी आहे. भारत – पाक तणावपूर्ण स्थितीमुळे आयपीएलला स्थगिती देण्यात आली होती. त्या काळात बरेचसे विदेशी खेळाडून भारतातून त्यांच्या मायदेशी परतले होते. आता त्यातील काही खेळाडू पुन्हा येणार नसल्याची माहिती आहे.
भारतीय खेळाडूंसाठी संधी
आयपीएलचे नवीन वेळापत्रक जाहीर झाले खरे. परंतु, त्यामुळे अनेक आंतरराष्ट्रीय आयसीसी सामन्यांच्या वेळापत्रकात बाधा येत आहे. आयपीएल लीग मॅचेसपेक्षा खेळांडूंसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट महत्वाचे आहे. त्यामुळे अनेक विदेशी खेळाडू आता पुढील सामन्यांसाठी उपलब्ध राहणार नसल्याची माहिती आहे. त्यामुळे संघांसमोर आगामी सामन्यांचे नियोजन कसे करायचे, असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे विदेशी खेळाडूंच्या जागी आता भारतीय खेळाडूंना संधी देण्याचे नियोजन संघ आखत आहे. ही नवोदित खेळाडूंना आपले कौशल्य दाखवण्याची उत्तम संधी मानली जात आहे.

विदेशी खेळाडू सामन्यांना मुकणार!
21 मे पासून आयर्लंड वेस्ट इंडिज एक दिवसीय सामन्यांना सुरूवात होणार आहे. वेस्ट इंडिजचे रोमारियो शेफर्ड (बंगळुरू), रूदरफोर्ड (गुजरात), शेमार जोसेफ (लखनऊ) हे आयपीएलमध्ये सहभागी होते. यानंतर वेस्ट इंडिज इंग्लंड बरोबर मर्यादीत षटकांची मालिका देखील खेळणार आहे. इंग्लंडकडून जोस बटलर (गुजरात), विल जॅक (मुंबई), आणि झॅक बेथेल (बंगळुरू) आयपीएलमध्ये खेळत आहेत. त्यामुळे गुजरात, बंगळुरू आणि मुंबईला या महत्वाच्या खेळाडूंच्या अनुपस्थितीत संघ बांधणी करावी लागेल.
दुसरीकडे 11 ते 15 जुनदरम्यान जागतिक अजिंक्यपद कसोटी अंतिम सामना ऑस्ट्रेलिया वि. दक्षिण आफ्रिका असा रंगणार आहे. त्यामुळे या दोन्ही संघांच्या खेळाडूंचे आयपीएलसाठी भारतात परतणे कठीण आहे. ही सर्व परिस्थिती पाहता संघ संयोजकांसमोर आता मोठं आव्हान असणार आहे. संघांसमोर भारतातील नवोदीत खेळाडूंना संधी देण्याचा पर्याय समोर दिसत आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत भारतीय खेळाडूंना संधी दिली गेल्यास ते या संधीच सोनं करणार का, ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.