‘उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने स्वतःचे चारित्र्य तपासावे’, प्रकाश आंबेडकरांवरील टीकेवर ‘वंचित’चा करारा जवाब

मुंबई : ‘ फुले’ चित्रपटास पाठिंबा देण्यासाठी प्रकाश आंबेडकर व त्यांच्या लोकांनी पुण्यातील फुले वाड्यावर आंदोलन केले. मात्र, फुले यांच्या विचारांना व कार्याला विरोध करणाऱ्या शक्तीशी प्रकाश आंबेडकरांची छुपी हातमिळवणी आहे आणि त्यामुळेच ‘फुले’ यांच्या विचारांना व कार्याला विरोध करणाऱ्यांना बळ मिळाले आहे. त्यामुळे समाजात गोंधळ आहे, अशी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मुखपत्र ‘सामना’तून करण्यात आली होती. या टीकेला वंचित बहूजन आघाडीने प्रत्युत्तर दिले आहे.

वंचितचे प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे म्हणाले, ‘फुले चित्रपटावर ब्राह्मण संघटनांकडून विरोध झाल्यानंतर बाळासाहेब आंबेडकर हे एकमेव नेते होते ज्यांनी या चित्रपटाच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरून आंदोलन केले. त्यांनी सेन्सॉर बोर्डाच्या निर्णयाला विरोध करत चित्रपटातील महत्त्वाच्या दृश्यांच्या कापणीविरोधात ठाम भूमिका घेतली. या संघर्षात महाविकास आघाडीतील कोणताही पक्ष सहभागी झाला नव्हता.’

‘शिवसेना 25 वर्षे भाजपसोबत युतीत होती आणि गोध्रा हत्याकांडाच्या वेळी भाजप व नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी उभी राहिली होती. अशा पक्षाने बाळासाहेब आंबेडकरांसारख्या नेत्यावर टीका करणे हे हास्यास्पद आहे. त्यांनी शिवसेनेला स्वतःचा राजकीय इतिहास तपासावा’, असा सल्ला देखील मोकळे यांनी दिला.

आंबेडकर भाजपच्या विरोधातच

बाळासाहेब आंबेडकर हे सत्ताधाऱ्यांच्या विरोधात न्यायालयीन, राजकीय आणि सामाजिक स्तरावर लढा देत आहेत. संध्याकाळी सहानंतर झालेल्या मतदानाच्या विरोधात त्यांनी केंद्रातील भाजप सरकारच्या विरोधात न्यायालयीन लढाई सुरू केली आहे. महाराष्ट्रात सोमनाथ सूर्यवंशी या भीमसैनिकाच्या पोलीस कोठडीत झालेल्या हत्येविरोधात त्यांनी रस्त्यावर उतरून आणि न्यायालयात महाराष्ट्रातील भाजप सरकारच्या विरोधात लढा दिला आहे. तसेच, बिहार मधील महायुती सरकारच्या विरोधात महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात यावा यासाठीही त्यांनी लढा दिला आहे, असे देखील मोकळे यांनी सांगितले.

शिवसेनेने पुनर्विचार करावा

‘बाळासाहेब आंबेडकर हे जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून लढणारे नेते आहेत. त्यांच्यावर कितीही टीका केली गेली तरी ती सूर्यावर थुंकण्यासारखी आहे. त्यामुळे स्वतःचे चेहरे रंगवून घेणे आता थांबवा. बाळासाहेब आंबेडकर यांच्यावर टीका करण्यापूर्वी शिवसेनेने स्वतःच्या भूमिकेचा पुनर्विचार करावा’, असे आवाहनही सिद्धार्थ मोकळे यांनी केले आहे.


About Author

Arundhati Gadale

Other Latest News