मुंबई – महायुतीने विधानसभा निवडणुकीपूर्वी अनेक योजनांची घोषणा केली होती. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना महायुतीसाठी गेमचेंजर ठरली. महायुती सत्तेत येण्यास या योजनेचा सिंहाचा वाटा असल्याचं राजकीय तज्ञ आणि जाणकार म्हणतात. दरम्यान, निवडणुकीपूर्वी जर आम्ही सत्तेत आलो तर लाडकी बहिण योजनेत 1500 ऐवजी 2100 रुपये देऊ, असं महायुतीने म्हटले होतं. दरम्यान, गेल्या 2 महिन्यापूर्वी अनेक निकषावरून 9 लाख लाडक्या बहिणींना या योजनेतून अपात्र ठरविण्यात आलेय. तर आता आणखी 8 लाख बहिणींना या योजनेत केवळ 500 रुपये मिळणार असल्याचे सरकारने म्हटले आहे. यावरुन सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात कलगीतुरा रंगला आहे.
बहिणींचा शाप लागेल…
दरम्यान, शेतकरी सन्मान योजनेतून ज्या महिला लाभ घेतायत, अशा 8 लाख महिलांना लाडक्या बहिणी योजनेतून केवळ 500 रुपये मिळणार असल्याचे सरकारने म्हटलेय. यावरून विरोधक आक्रमक होत सरकारवर निशाण साधला आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना केवळ निवडणूक आणि मतांसाठी आणली होती. पूर्वी 9 लाख महिलांना अपात्र ठरविल्यानंतर आता 8 लाख महिलांना हे सरकार अपात्र ठरवत आहे. निवडणुकीपूर्वी 2100 रुपयांचे आश्वासन दिले होते. अजून 2100 रुपये मिळत नाहीत. सुरुवातीला लाडक्या बहिणींची मतं घेतली, पण आता पैसे द्यायची वेळ आल्यावर यांना निकष, अटी आणि नियम आठवतात. त्यामुळे लाडक्या बहिणींची कळकळ आणि शाप या सरकारला लागल्याशिवाय राहणार नाही, असा हल्लाबोल काँग्रेस नेते नाना पटोले यांनी सरकारवर केला आहे.

2100 रुपयांचे आम्ही आश्वासन पूर्ण करु…
जे नियम, अटी आणि निकष जे पूर्वी होते. तेच आता देखील आहेत. यात कोणतेही बदल करण्यात आले नाहीत. ज्या महिला शेतकरी सन्मान योजनेचा लाभ घेतात अशांनाअपात्र करण्यात आले आहे. सरकारने ज्या ज्या योजनांची घोषणा केली आहे. त्या योजना सुरूच राहतील. आता नवीन कोणतेही नियम किंवा अटी सरकारने आणले नाहीत. सर्व योजना सुरु ठेवणार, विरोधक काहीही आरोप करताहेत. योजनासाठी निधी नसल्याचे विरोधक म्हणताहेत. पण सरकार काहीही करुन योजना बंद करणार नाही. उलट या योजनेमध्ये सरकारने 2100 रुपयांचे आश्वासन दिलं होते तेही पूर्ण करेल. असा विश्वास कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी व्यक्त केला आहे.