पुणे : भीमा कोरेगाव हिंसाचारप्रकरणी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मोठी मागणी केली आहे. हिंसाचारप्रकरणी न्यायालयीन चौकशी आयोगासमोर आज सुनावणी झाली. या सुनावणी दरम्यान आंबेडकर यांनी आयोगाकडे एक अर्ज दाखल करत शरद पवार यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेले पत्र सादर करण्याची मागणी केली होती. या पत्रात “भीमा कोरेगाव येथील हिंसाचार पूर्वनियोजित होता,” असे नमूद करण्यात आले होते. या संबंधित पत्राची बातमी एका मराठी वृत्तपत्रात प्रसिद्ध झाल्याचे देखील आंबेडकर यांनी म्हटले आहे.
शरद पवार यांच्याकडे जर हे पत्र अस्तित्वात असेल, तर ते आयोगासमोर सादर व्हावे, अशी आमची भूमिका असल्याचे अॅड. आंबेडकर यांनी स्पष्ट केले. आयोगाने आमची बाजू विचारात घेतली असून या संदर्भात लवकरच निर्णय आयोग घेणार आहे.

आज भीमा कोरेगाव चौकशी आयोगाची सुनावणी पार पडली. आजच्या सुनावणीसाठी आम्ही आयोगापुढे अर्ज दिला होता. त्यात मागणी केली होती की, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र दिले होते, त्यात त्यांनी 'भीमा कोरेगाव येथील हिंसाचार हा… pic.twitter.com/APMWSCC1p9
— Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) April 23, 2025
भीमा कोरेगाव हिंसाचारप्रकरण
31 डिसेंबरला 2017 ला एल्गार परिषदेचे आयोजन पुण्यातील शनिवारवाडा येथे करण्यात आले होते. या परिषदेनंतर एक जानेवारी 2018 ला भीमा कोरेगाव येथे विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी भीम अनुयायी मोठ्या प्रमाणात जमले होते. मात्र, एल्गार परिषदेमधून हिंसाचारासाठी विधान करण्यात आली तसेच पूर्वनियोजित कट करून दंगल घडवण्यात आल्याचा आरोप आहे. या हिंसाचारात एक जणाचा मृत्यू तर अनेक जण जखमी झाले होते. या प्रकरणावरून पोलिसांनी नक्षलवाद्यांशी संबंध असल्याचा आरोप करत काही विचारवंत, कार्यकर्ते यांना अटक केली होती. तर, हिंसाचारासाठी मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे जबादार असल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला होता.
शरद पवार यांनी म्हणणे आयोगासमोर मांडवे
प्रकाश आंबेडकर यांनी मागणी केली की या प्रकरणाशी संबंधित पत्र शरद पवारांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लिहिले होते. त्यामुळे शरद पवारांनी आयोगाच्या पुढे येत या विषयी वस्तुस्थिती मांडावी. शरद पवारांकडे या संदर्भात काही पुरावे असतील तर त्यांनी ते आयोगाच्या समोर सादर केले पाहिजेत.