पर्यटकांना परत आणण्यासाठी अजितदादांचा ओमर अब्दुल्लांना फोन, मदत करण्याची विनंती

मुंबई : पहलगाम (जम्मू-काश्मीर) येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू आणि काश्मिरमध्ये गेलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी आणि त्यांना राज्यात सुखरुप परत आणण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. याबाबतीत जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्रीओमर अब्दुल्ला यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून महाराष्ट्रातील पर्यटकांना तातडीनं आवश्यक ती मदत पुरवण्याची विनंती केली आहे. प्रत्येक पर्यटकाला सुरक्षितपणे घरी परत आणणं आणि त्यांच्या कुटुंबांना दिलासा देणं, हीच आमची प्राथमिकता आहे.

अडकून पडलेल्या पर्यटकांशी समन्वय साधण्यासह त्यांना आवश्यक मदतीसाठी मंत्रालयातील आपत्ती निवारण कक्षात विशेष अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात येणार आहे. काश्मिरमध्ये अडकलेल्या पर्यटकांच्या नातवाईकांनी घाबरुन जाऊ नये, असं आवाहन अजित पवार यांनी केले आहे.

विशेष विमानाची व्यवस्था

केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याशी देखील संपर्क साधून विशेष विमानसेवा उपलब्ध करून देण्याचं नियोजन करण्यात येत आहे. शक्य तितकी अधिक विमानं पाठवून पर्यटकांची जलद व सुरक्षित परतीची व्यवस्था करण्यात येणार आहे,अशी माहिती अजित पवारांनी दिली होती. त्याप्रमाणे इंडिगोचे खास विमान उद्या महाराष्ट्रातील पर्यटकांना कश्मीरमधून मुंबईत घेऊन येणार आहे.

भ्याड हल्ल्याचा निषेध

काश्मीरमधील पहलगाम भागात पर्यटकांवर झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा अजित पवारांनी तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला. या दुर्दैवी घटनेत काही पर्यटकांचा मृत्यू तर, काही जण गंभीर जखमी झाल्याचं वृत्त अतिशय धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारं आहे. या दुर्घटनेत मृत्यू पावलेल्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांप्रती सहसंवेदना व्यक्त करतो. जखमींच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा होवो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो, असे अजित पवार यांनी म्हटले होते.

 


About Author

Arundhati Gadale

Other Latest News