नाशिक- अनधिकृत दर्गावर करण्यात आलेली कारवाई आणि ठाकरेंच्या शिवसेनेचा मेळावा या दोन्ही बाबांमुळे नाशिक आज चर्चेत आहे. शहरातील काठे गल्ली परिसरात असलेल्या अनधिकृत दर्गा काढण्यावरुन मध्यरात्री वाद झाला. प्रशासकीय अधिकारी, पोलीस आणि मुस्लीम धर्मगुरुंच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली. मात्र ही कारवाई करताना मध्यरात्री काठे गल्लीत मोठा जमाव जमा झाला होता. त्यामुळं काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली. जमावातील काही जणांनी मध्यरात्री अचानक दगडफेक केल्यानंतर पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. त्यानंतर परिस्थिती आता नियंत्रणात असल्याचं सांगण्यात येतंय. दगडफेक करणाऱ्यांपैकी काही जणांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचीही माहिती आहे.
काठे गल्लीतील दर्ग्याचा घटनाक्रम
1. फेब्रुवारी महिन्यात अनधिकृत दर्ग्याचा मुद्दा उपस्थित झाला होता
2. अनधिकृत बांधकाम काढून घ्या, अन्यथा बजरंग बलीचे मंदिर उभारू सकल हिंदू समाजाचा इशारा
3. वक्फ बोर्डासह उच्च न्यायालयात मुस्लिम एकता मंडळाने घेतली होती धाव
4. उच्च न्यायालयात धाव घेतल्यानंतर ठोस पुरावे सादर करू न शकल्याने मुस्लिम एकता मंडळाची याचिका फेटाळली
5. एप्रिलला नाशिक महापालिकेने अनधिकृत दर्ग्याच्या बाबत नोटीस बजावत 15 दिवसांत बांधकाम काढून घेण्याची सूचना केली
6. १५ दिवसांत स्वतःहून बांधकाम काढून न घेतल्याने १६ एप्रिलला रात्री पोलिस प्रशासनाने बंदोबस्त लावला
7. पोलिसांनी बंदोबस्त लावताच जमावाने पोलिसांवर दगडफेक करत हल्ला केला, त्यात 4 पोलीस अधिकारी आणि 11 कर्मचारी जखमी
8. रिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज करत अश्रूधुराच्या कांड्या फोडल्या
9. जमावाच्या दगडफेकीत पोलीस अधिकारी कर्मचारी जखमी आणि वाहनांचेही झाले मोठे नुकसान
10. नाशिक महापालिकेने १६ एप्रिलला पहाटेपासून अतिक्रमण काढण्यास केली सुरुवात
11. नाशिक महा पालिकेकडून अतिक्रमण काढल्यानंतर मलबा काढण्यास सुरुवात

ठाकरेंच्या शिवसेनेचं टीकास्त्र
ठाकरेंच्या शिवसेनेचं शिबीर असलेल्या दिवशीच सत्ताधाऱ्यांनी अनधिकृत दर्ग्यावर कारवाईची वेळ निवडली अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेच्या शिबीराला महत्त्व मिळू नये यासाठी हे करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केलाय. हिम्मत असेल तर समोर येऊन लढा, मात्र त्यांना वातावरण खराब करायचं आहे, अशी टीकाही त्यांनी केलीय. बेकायदेशीर अ्सेल तर कारवाई व्हाययलाच हवी मात्र भाजपावाल्यांनी जो मुहुर्त शोधलाय. त्या मुहूर्तावर आक्षेप असल्याचं त्यांनी म्हटलय.