पटणा : दिवाळीनंतर बिहार निवडणुकीचा बार उडण्याची शक्यता आहे. त्यामुळे नितीश कुमार जनता दल (संयुक्त) तसेच भाजपक या एनडीएतील पक्षांकडून मोर्चे बांधणी केली जात आहे. बिहारमधील जातींचे समीकरण पाहाता येथे प्रत्येक छोटा पक्ष देखील मोठी भूमिका बजावू शकतो.
निवडणुकीची तयारी सुरू असतानाच राष्ट्रीय लोक जनशक्ती पार्टी ( रालोजपा) एनडीएमधून बाहेर पडली आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष पशुपती कुमार पारस यांनी एनडीएमधून बाहेर पडण्याची घोषणा केली. नितीश कुमार हे दलित विरोधी असून आमचा आणि एनडीएचा काही संबंध उरला नसल्याचे पारस यांनी जाहीर केले.

पारस म्हणाले, आम्ही 2014 पासून एनडीएसोबत आहोत. मात्र, लोकसभा निवडणूक आली की दलित मतं मिळवण्यासाठी केवळ आमचा वापर केला जातो. आमच्यावर अन्याय केला जातो. आम्हाला जर योग्य सन्मान मिळणार असेल तर भविष्यात पुन्हा एनडीएमध्ये जाण्याचा विचार करू.
रामविलाल पासवान यांना भारतत्नची मागणी
रामविलास पासवान यांना भारतरत्न देण्याची मागणी पारस यांनी केली. तसेच नितीश कुमार यांच्यावर जोरदार टीका केली. बिहार विधानसभेसाठी पक्षाची संघटनात्मक बांधणी मजबूत करणार असून नवीन कार्यकर्त्यांची नोंदणी केली जाणार आहे. बिहारच्या निवडणुकीसाठी आपण सज्ज असल्याचे पारस यांनी सांगितले.
पारस यांचा स्वबळाचा नारा
पारस यांनी सांगितले त्यांचे कार्यकर्ते बिहारच्या 243 मतदारसंघात बांधणी करत असून पक्ष मजबूत करत आहेत. जो पक्ष आम्हाला योग्य सन्मान देईल त्याच्यासोबत जाण्याचा निर्णय आमच्या पक्षातील सर्व नेते एकत्र येऊन घेऊ. पण आम्ही सर्वच मतदारसंघात तयारी करत असून स्वबळावर लढण्यास सज्ज असल्याचेही पारस यांनी ठणकावले.
भाजपकडून बूथ मजबूत मोहीम
मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक ज्या प्रकारे बूथ यंत्रणेच्या पद्धतीने लढली गेली. तसेच मंत्र्यांवर मतदारसंघांची जबाबदारी टाकण्यात आली. तोच पॅटर्न बिहार निवडणुकीत वापरला जाणार आहे. बूथ मजबूत करण्यावर भाजप श्रेष्ठींकडून सांगितले जात असून अमित शाह स्वतः या तयारीवर लक्ष ठेवून आहेत.