सांगली : अपक्ष म्हणून विजयी झालेले खासदार विशाल पाटील यांनी काँग्रेसला पाठींबा दिलेला आहे. लोकसभेत ते काँग्रेससोबत असतात. वसंतदादांचे घराणे हे काँग्रेससोबत असणारा असे म्हणाणाऱ्या विशाल पाटलांचे सूर काहीसे बदलले आहेत. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या सांगलीत डिजीटल मीडियाच्या अधिवेशनात विशाल पाटलांनी आपल्या मनात काय आहे ते सांगून टाकले.

विशाल पाटील म्हणाले, येथे उपस्थित असणारे जयकुमार गोरे हे अपक्ष म्हणून पहिल्यांदा निवडूण आले होते. मी पण पहिल्यांदा अपक्ष म्हणून निवडूण आलो आहे. गोरे हे आमचे जावई आहेत. आमच्या शेजारीच त्यांची सासूरवाडी आहे. भिंतीला भिंत आहे. मी आता परत काँग्रेसमध्ये जाईन किंवा कोणत्यातरी पक्षात जाईन पण कुठेतरी जाऊन मंत्रिपद मिळावे, अशी अपेक्षा आहे. गोरेंसारखी आमची सुरुवात व्हावी.
मतदारसंघातील कामं होणे महत्त्वाची आहेत. आपल्या जिल्ह्याचा, भागाचा विकास झाला पाहिजे. त्यासाठी धोरण ठरवले गेले पाहिजे त्यासाठी पक्षाच्या पलिकडे जाऊन नाती संभाळली पाहिजेत असे देखील पाटील म्हणाले.
भाजपकडून तयारी सुरू…
लोकसभेत सांगलीत पराभव झाल्यानंतर भाजपने पुन्हा येथे तयारी सुरू केली आहे. भाजपचे लोकसभेचे उमेदवार संजयकाका पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले आहेत. त्यांना परत आणण्याच्या हालचाली भाजपमध्ये सुरू आहे. काही दिवसांपूर्वी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी संजयकाका पाटील यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली होती.
विशाल पाटील काँग्रेसचे सहयोगी सदस्य
विशाल पाटील यांना लोकसभेत काँग्रेसने तिकीट नाकारले होते. ही जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मिळाली होती. त्यामुळे बंडखोरी करत विशाल पाटील यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला. काँग्रेस नेत्यांनी त्यांचे मन वळविण्याचे प्रयत्न केले मात्र ते बंडखोरीवर ठाम राहिले. तिरंगी लढती विशाल पाटलांनी विजय देखील मिळवला. मात्र, विजयानंतर ते पुन्हा त्यांनी काँग्रेसशी जवळीक साधली. सध्या ते लोकसभेत काँग्रेसचे सहयोगी सदस्य आहेत.