पहलगाम : जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये जवानांसह 27 हून अधिक पर्यटक मृत्यूमुखी पडल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मृत्यांमध्ये महाराष्ट्रातील दोघांचा समावेश आहे. 370 कलम हटवल्यानंतर जम्मू काश्मीरच्या पर्यटनामध्ये मोठी वाढ झाली होती. देशभरातून तसेच विदेशातून देखील पर्यटक मोठ्या संख्येने कश्मीरमध्ये येत होते. दहशतवादी हल्ल्याच्या माहितीनंतर जम्मू कश्मीरमध्ये असलेल्या पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
मिळालेल्या माहितीनुसार तब्बल दोन हजार पर्यटक जम्मू कश्मिरमध्ये अडकले आहेत. हल्लानंतर बहुतांश पर्यटक पुन्हा आपल्या राज्यात परतण्यासाठी प्रयत्न करत आहेत. केंद्र सरकार आणि राज्य सरकारने पर्यटकांच्या सुरक्षेची हमी घेतली असून घाबरून न जाण्याचे आवाहन केले आहे.

मृत्यांमध्ये महाराष्ट्रातील दोघे
पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील दोघांचा समावेश आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. दिलीप डिसले, अतुल मोने असे मृत पर्यटकांचे नावे आहेत. तर, महाराष्ट्रातील आणखी दोघे जण जखमी झाले आहेत. महाराष्ट्र सरकार जम्मू काश्मीर प्रशासनाच्या संपर्कात असून महाराष्ट्राच्या पर्यटकांना परत आणण्याच्या हालचाली सुरू आहेत.
पंतप्रधान मोदींचा दहशतवाद्यांना इशारा
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी ट्विट करत दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. मृतांच्या नातेवाईकांना धीर देत दहशतवादी हल्लापुढे भारत झुकणार नसून सक्षमपणे याचा प्रतिकार करेल तसेच हल्लासाठी जबाबदार असणाऱ्यांना सोडणार नसल्याचा इशारा दिला आहे.