NAINA CITY: तिसरी मुंबई उभी करायला, दक्षिण कोरिया लावणार हातभार?

तिसरी मुंबई म्हणजेच नैना शहारची निर्मिती हा अनेक दिवसांपासून चर्चेचा विषय आहे. आता यामध्ये दक्षिण कोरिया हातभार लावणार आहे...

मुंबई: तिसरी मुंबई अर्थात नैना शहर हा अनेक दिवसांपासून चर्चेचा विषय राहिलेला आहे. नवी मुंबई विमानतळ प्रभावक्षेत्रात या शहराची निर्मिती केली जाणार आहे. अटल सेतूच्या प्रभाव क्षेत्रात मुंबई महानगर विकास प्राधिकरण अर्थात एमएमआरडीएकडून या शहराची निर्मिती केली जाणार आहे. त्यात हायटेक व्यवसाय उद्योग, फिटनेस झोन, तसेच हरित क्षेत्राचा समावेश असेल.

दक्षिण कोरिया हातभार लावणार

व्हिजन मुंबई 3.0 नुसार भविष्यातील नावीन्यपूर्ण व सर्वसमावेशक तिसरी मुंबई हे महानगर घडविण्यासाठी एमएमआरडीएने आता पुढचे पाऊल उचलले आहे. हे शहर वसविण्यात आता दक्षिण कोरियाचा मुख्य सहभाग राहणार आहे. जागतिक दर्जाच्या या स्मार्ट सिटीच्या निर्माणासाठी दक्षिण कोरियाने गुंतवणूक करण्याची तयारी दर्शविली आहे.

अशी असेल तिसरी मुंबई

तिसऱ्या मुंबईची निर्मिती तसेच पायाभूत सुविधांच्या विकासासाठी दक्षिण कोरियाने हालचाली सुरू केल्या आहेत. कोरियाचे उच्चाधिकारी आणि काही तज्ज्ञांसोबत एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांची नुकतीच बैठक झाली. त्यात ट्रांझिट ओरीएंटेड डेव्हलपमेंट प्रकल्प, मिश्र वापराच्या काही टाऊनशिप, तंत्रज्ञान पार्क, औद्योगिक वसाहती, लॉजिस्टीक हब असे सर्वसमावेशक नियोजन असणार आहे. यामध्ये काही डेटा सेंटर्स देखील उभारले जाणार आहेत. परवडणाऱ्या गृहनिर्माण क्षेत्रातील गुंतवणुकीसाठी देखील विशेष प्रयत्न केले जात आहेत.

याबाबत दक्षिण कोरियाच्या अधिकाऱ्यांसोबत एमएमआरडीएची जी बैठक झाली, त्यामध्ये महानगर आयुक्त डॉ संजीव मुखर्जी यांच्यासह एमएमआरडीएचे उच्चपदस्थ अधिकारी, सिव्हिल इंजिनियर्स, नगर विकासक, दक्षिण कोरियाचे सर्व क्षेत्रातील उच्च पदस्थ अधिकारी आदी उपस्थित होते.

तंत्रज्ञानाच्या माध्यमातून एकात्मिक शहरी विकास साधला जाणार आहे. लॉजिस्टीक, ट्रान्झिट हब आणि नवीन काही गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. मुंबई, नवी मुंबईचा विकास आणि क्षेत्रवाढीला येणाऱ्या मर्यादा विचारात घेता नैना शहराची निर्मिती अत्यंत गरजेची आहे. त्यादृष्टीने उचलली जाणारी ही पाऊले महाराष्ट्राच्या विकासाला गती देणारी ठरणार आहेत. नैनाच्या विकासामुळे जागतिक पातळीवर मुंबई एक महत्वाचे आणि प्रमुख व्यापारी शहर बनेल.


About Author

Rohit Shinde

Other Latest News