PNB घोटाळ्यातील आरोपी मेहुल चोक्सीला बेल्जियममध्ये अटक, उपचाराचं कारण सांगून जामीन मागण्याची शक्यता

चोक्सी प्रकृती अस्वस्थ्याचं कारण देत सुटकेची मागणी करण्याची शक्यता आहे. यासाठी चोक्सीनं कोर्टात जामीन अर्ज दाखल केल्याचीही माहिती आहे.

PNB scam Mehul Choksi : पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील फरार आरोपी मेहुल चोक्सी अखेर केंद्र सरकारच्या रडारवर आलेला आहे. पीएनबीत सुमारे 13 हजार 800 कोटी रुपयांचा घोटाळा केलेल्या चोक्सीला बेल्जियममध्ये बेड्या ठोकण्यात आल्यात. सीबीआयच्या वतीनं बेल्जियम सरकारला केलेल्या विनंतीनंतर ही प्रक्रिया करण्यात आलीय. त्यानंतर आता चोक्सीला भारतात प्रत्यार्पणाबाबत चर्चा सुरू असल्याची माहिती आहे. 2018 साली उघड झालेल्या या घोटाळ्यात मेहुल चोक्सीला फरार आर्थिक गुन्हेगार म्हणून घोषित करण्यात आले होते.

बेल्जियममध्ये 12 एप्रिलला चोक्सीला अटक करण्यात आलीय. बेल्जियमनं या अटकेवर प्रतिक्रिया देताना सांगितलं की, पुढील न्यायिक प्रक्रिया होईपर्यंत चोक्सीला जेलमध्ये ठेवण्यात येईल. चोक्सी प्रकृती अस्वस्थ्याचं कारण देत सुटकेची मागणी करण्याची शक्यता आहे. यासाठी चोक्सीनं कोर्टात जामीन अर्ज दाखल केल्याचीही माहिती आहे. उपचारासाठी बेल्जियममध्ये आल्याचं चोक्सीनं सांगितलंय. सध्या चोक्सी त्याच्या पत्नीसोबत एंटवर्पमध्ये वास्तव्यात होता.

स्वित्झर्लंडला पळण्याच्या तयारीत होता चोक्शी

मेहुल चोक्सीवर 13800 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी तो बेल्जियममध्ये असल्याची माहिती समोर आली होती. बेल्जियमची नागरिकत्त्वही त्यानं घेतलं होतं. बेल्जियमच्या परराष्ट्र मंत्रालयान तो देशात असल्याची माहिती भारताला पुरवली होती. यानंतर चोक्सी स्वित्झर्लंडला पळून जाण्याच्या तयारीत असल्याचंही समोर आलंय.

कॅन्सरवरील उपचाराचं कारण सांगत प्रत्यार्पण रोखण्याची शक्यता

अटकेनंतर मेहुल चोक्सी जामिनासाठी अर्ज दाखल करणार असल्याचं चोक्सीचे वकील विजय अग्रवाल यांनी सांगितलंय. चोक्सी हा आजारी असून त्याच्यावर कॅन्सरचे उपचार सुरु आहेत. अशी स्थितीत तो पळून जाण्याची स्थिती नाही, त्यामुळे त्याला जेलमधून सोडून प्रत्यार्पणाविरोधात कायदेशीर लढा देण्याची परावनगी मिळावी यासाठी कोर्टात याचिका करण्यात येणार असल्याचं सांगण्यात येतंय. चोक्सीचं प्रकरण हे राजकीय असून, भारतातील तुरुंगांची अवस्था दयनीय असल्याचं कारणही चोक्सीकडून पुढं करण्यात येतंय.

पत्नीच्या मदतीनं बेल्जियमचं नागरिकत्व

खोट्या कागदपत्रांच्या आधारे आणि बेल्जियम नागरिक असलेल्या पत्नीच्या मदतीनं चोक्सीनं तिथलं नागरिकत्व मिळवलं असल्याची माहिती आहे. भारत आणि एंटिगुआ या देशांचं असलेलं नागरिकत्व चोक्सीनं लपवल्याचा आरोपही करण्यात येतोय.

2018 साली भारतातून पलायन करण्यापूर्वी चोक्सीनं 2017 साली एंटिगुआ-बारबुडाचं नागरिकत्व घेतलं होतं. वारंवार प्रकृतीचं कारण देश भारतात सुनावणी टाळण्याचा प्रयत्न चोक्सीकडून करण्यात आलाय. काही वेळी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्याची सुनावणी झालेली आहे. भारतातील त्याची संपत्तीही यापूर्वी जप्त करण्यात आलीय. चोक्सीचा पुतणा नीरव मोदी हाही या घोटाळ्यातील आरोपी असून लंडनमध्ये त्याच्या प्रत्यार्पणासाठीही प्रयत्न सुरू आहेत.


About Author

Smita Gangurde

Other Latest News