मुंबई – भारतरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात राज्यासह देशभरात साजरी केली जाणार आहे. यासाठी राज्यभर विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती देशासह परदेशातही साजरी केली जाते. दरम्यान, या धरतीवर आता भारतीयासाठी एक अभिमानाची बातमी समोर येत आहे. न्यूयॉर्क शहरात आता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती हा दिवस “डॉ. बाबासाहेब आंबेडकर दिन” म्हणून साजरा होणार आहे. याबाबत न्यूयॉर्क शहराचे महापौर एरिक अॅडम्स यांनी घोषणा केली आहे.
बाबासाहेबांच्या कार्याला मानवंदना…
न्यूयॉर्क शहराचे महापौर एरिक अॅडम्स यांनी १४ एप्रिल २०२५ हा दिवस भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, समाजसुधारक आणि मानवाधिकारांचे प्रणेते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जन्मदिनानिमित्त “डॉ. बाबासाहेब आंबेडकर दिन” म्हणून घोषित केला आहे. हा ऐतिहासिक निर्णय डॉ. आंबेडकर यांच्या समता, लोकशाही आणि दलित-महिला, सामाजिक, शैक्षणिक तथा सक्षमीकरणाच्या कार्याला मानवंदना देणारा आहे. कोलंबिया विद्यापीठाचे माजी विद्यार्थी असलेल्या आंबेडकर यांच्या न्यूयॉर्कमधील वास्तव्यातूनच त्यांच्या न्याय आणि लोकशाहीच्या विचारांना प्रेरणा मिळाली. यासाठी श्रेय फाउंडेशन फॉर ह्युमन होरायझनचे अध्यक्ष दिलीप म्हस्के यांनी पुढाकार घेतल्याचे बोलले जाते. ज्यांनी आंबेडकर यांचा वारसा आणि बाबासाहेबांचे काम जागतिक पातळीवर पोहोचविण्यास प्रयत्न केले.

जगभरातील अनुयायींसाठी महत्त्वाचा क्षण…
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा हा केवळ सन्मान नाही, तर न्यूयॉर्कला मानवाधिकारांचे जागतिक केंद्र म्हणून स्थापित करणारा क्षण आहे, असे दिलीप म्हस्के यांनी म्हटले आहे. युनायटेड नेशन्समध्येही हा दिवस साजरा होतो, जिथे आंबेडकर यांच्या विचारांचा जागतिक प्रभाव अधोरेखित होतो. न्यूयॉर्कने यापूर्वी 2023 मध्ये “डॉ. बी. आर. आंबेडकर मार्ग” असे रस्त्याचे नामकरण करून इतिहास रचला होता. यानंतर आता बाबासाहेबांच्या जन्मदिनी “डॉ. बाबासाहेब आंबेडकर दिन” म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्यामुळं न्यूयॉर्क आणि शहराचे महापौर यांच्या या निर्णयाचे स्वागत केले जात असून, त्यांचे कौतूक केले जात आहे. दरम्यान, ही घोषणा जगभरातील कित्येक आंबेडकरी अनुयायी आणि आंबेडकरी विचारवादींसाठी आशेचा किरण असल्याची भावना व्यक्त होत आहे.