भोपाळ- देशभरात सध्या भाजपा प्रदेशाध्यक्षपदाच्या निवडणुका सुरु आहेत. मध्य प्रदेशातही भाजपाला मंगळवारी नवा अध्यक्ष मिळालाय. बैतुलचे आमदार हेमंत खंडेलवाल यांचं नाव सर्वसहमतीनं निश्चित करण्यात आलं आणि त्यांनतर बिनविरोध त्यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली. व्ही डी शर्मा यांची जागा आता हेमंत खंडेलवाल घेतील.
मध्य प्रदेशच्या भाजपा प्रदेशाध्यक्षपदाच्या निवडीसाठी केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना निवडणूक प्रभारीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. तर खासदार सरोज पांडे यांच्याकडे पर्यवेक्षकपदाची जबाबदारी देण्यात आली होती. ठरलेल्या वेळी निवडणूक प्रक्रिया सुरु करण्यात आली. हेमंत खंडेलवालही प्रदेश कार्यालयात दाखल झाले. त्यांचा नामांकन अर्ज मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव, केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान आणि प्रदेशाध्यक्ष व्ही डी शर्मा यांनी भरला.

एकच अर्ज, बिनविरोध निवड
निवडणूक प्रक्रियेच्या अधिसूचनेनुसार मंगळवारी १ जुलैला रात्री ८.३० पर्यंत निवडीची संपूर्ण प्रक्रिया पार पाडणं अपेक्षित होतं. मात्र प्रदेशाध्यक्षपदासाठी हेमंत खंडेलवाल यांच्या एकट्याचंच नामांकन असल्यामुळे मतदानाची वेळच आली नाही. त्यामुळं निवडणूक प्रभारी धर्मेंद्र प्रधान यांनी खंडेलवाल यांची बिनविरोध निवड झाल्याचं जाहीर केलं.
हेमंत खंडेलवाल यांची कारकीर्द
३ सप्टेंबर १९६४ रोजी जन्मलेले हेमंत खँडलेवाल हे सध्या बैतूल विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. २०१३ आणि २०२३ या दोन्ही विधानसभा निवडणुकीत त्यांनी या मतदारसंघातून विजय मिळवलेला आहे. त्यांचे वडील विजयकुमार खंडेलवाल हे खासदार होते. त्यांच्या निधनानंतर २००८ साली झालेल्या पोटनिवडणुकीत हेमंत खंडेलवाल हे विजयी झाले होते. १४ व्या लोकसभेत त्यांनी खासदार म्हणून काही काळ काम पाहिले. २०१४ ते २०१८ या काळात ते भाजपा प्रदेशाचे कोषाध्यक्ष होते. २०२१ साली पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी प्रवासी कार्यकर्त्यांचे प्रभारी अशी त्यांच्याकडे जबाबदारी होती. तर २०२२ साली उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांतही त्यांच्याकडे प्रवासी कार्यकर्ता प्रभारीपदाची जबाबदारी होती. कुशाभाऊ ठाकरे ट्रस्टचे ते अध्यक्षही आहेत. कॉमर्स आणि एलएलबीची पदवी हेमंत खंडेलवाल यांच्याकडे असून ते व्यावसायिक आहेत.