मध्य-पूर्वेतील तणाव आता काहीसा निवळण्याची चिन्हं दिसत आहेत. इराण- इस्रायल युध्दाला विराम घोषित करण्यात आला आहे, मोठ्या गोंधळानंतर काल इस्त्रायल आणि इराणमध्ये युद्ध बंदी झाली. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, इराण आणि इस्त्रायल या तिघांनी विजयाचा दावा केला आहे. परंतु नेमका कोणता देश या संघर्षात बलशाली ठरला, याची जोरदार चर्चा सध्या पाहायला मिळत आहे.
इराण-इस्रायल तोडीस तोड?
इस्त्रायल आणि इराण यांनी एकमेकांना चांगलंच झुंजवलं यात शंका नाही. युद्धाला निर्णायक परिस्थितीत आणण्याचे काम अमेरिकेने अखेरच्या टप्प्यात केले. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, इराण आणि इस्त्रायल या तिघांनी विजयाचा दावा केला आहे. त्यामुळे जग बुचकाळ्यात पडले आहे. कुणाच्या पदरात पडलं काय? हा तात्पुरता युद्ध विराम की पुन्हा दोन्ही देश एकमेकांवर तुटून पडणार? याचे दावे करण्यात येत आहेत.

गेल्या 12 दिवसांपासून युद्धाची धग मध्य-पूर्व सहन करत होता. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर तुफान हल्ले सुरू होते. त्यात अनेक नागरिकांचा जीव गेला. अनेक शहरांचे मोठे नुकसान झाले. सैन्य तळावर हल्ले करण्यात आले. त्यानंतर अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या युद्धात उतरण्याची घोषणा केली. अमेरिका सुरुवातीला केवळ निरीक्षकाची भूमिका घेत होती, पण “ऑपरेशन मिडनाईट हॅमर” अंतर्गत इराणच्या तीन अणुऊर्जा ठिकाणांवर अमेरिकेने थेट हल्ला केला आणि त्यानंतर संघर्ष अधिक तीव्र झाला. त्यानंतर इराणने कतारमधील अमेरिकेच्या ‘अल उदीद’ हवाई तळावर क्षेपणास्त्र हल्ला केला. विशेष म्हणजे हा हल्ला करण्यापूर्वी इराणने अमेरिका आणि कतारला पूर्वसूचना दिली होती.
या परिस्थितीत अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अचानक शस्त्रसंधीची घोषणा केली आणि तेल अवीव (इस्त्राईल) आणि तेहरान (इराण) यांच्यात युद्धबंदी लागू झाली. विशेष म्हणजे या युद्धात अमेरिका, इस्त्राईल आणि इराण तिघेही विजयी असल्याचा दावा करत आहेत.
अमेरिकेच्या हस्तक्षेपामुळेच युध्द थांबले?
अमेरिका इराण-इस्त्रायल युद्धात फारसा अडकली नाही, पण या महाशक्तीने सामरिक ताकद जगासमोरदाखवली. ट्रम्प प्रशासनाने इराणला ‘मिडल ईस्टमधील दादा’ संबोधून कठोर इशारा दिला आणि नंतर तीन अणुऊर्जा प्रकल्पावर हल्ला केला. इराणची अणु क्षमता संपवल्याचा दावा केला. ट्रम्प यांनी एका पोस्टमध्ये या युद्धात अमेरिकेने काय कमावले याचा दोन ओळीत दाखला दिला. “एकही अमेरिकन जखमी झाला नाही आणि आता इराणच्या हातातून बरंच काही बाहेर गेलं आहे.” यामुळे या युध्दात इराण-इस्रायला निकराने लढले असले तरी जागतिक पातळीवर अमेरिकेने आपलं महत्व सिद्ध केलं आहे, आणि यशस्वी मध्यस्थी करत युध्दविराम घडवून आणला आहे, हेच खरे.