परळी : बीडमधील गुन्हेगारी घटनांचे सत्र संपण्याचे नावच घेत नाही. एकामागून एक घटना उघडकीस येत आहेत. तब्बल एका महिन्यापूर्वी घडलेली धक्कादायक घटना आता पुढे आली आहे. साक्षी कांबळे या तरुणीने छेडछाडीला कंटाळून 14 मार्चला गळफास घेत आत्महत्या केली. तिच्या मृत्यूनंतर आता तब्बल एक महिना उलटून गेला असला तरी तिच्या कुटुंबीयांना अजूनही न्याय मिळालेला नाही.
साक्षीची आई मुलीच्या मृत्यूनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एक भावनिक पत्र लिहिले आहे. त्या पत्रात त्यांनी स्वतःला “तुमची लाडकी बहीण” म्हणून संबोधले आहे आणि म्हटले आहे की तुम्ही मुख्यमंत्रीपदामुळे अनेक बहिणींना बळ मिळाले. पण आज माझ्यासारख्या बहिणीला तुमची फार उणीव जाणवते.

स्वप्न अपूरे राहिले…
आईने पत्रात म्हटले आहे की, माझी मुलगी एअर होस्टेस (हवाई सुंदरी) होण्याचे स्वप्न बघत होती. मात्र काही मुलांनी तिची छेड काढत होते त्यांच्या छेडछाडीला कंटाळून अखेर तिने आयुष्य संपवलं. साहेब, ती परत येणार नाही हे मान्य आहे, पण तिच्यावर अन्याय करणाऱ्या नराधमांना शिक्षा होणं अत्यावश्यक आहे. तसेच छेडछाड करणारे मुलींचे फोटो काढून ब्लॅकमेल करतात असे देखील पत्रात म्हटले आहे.
‘त्या’ टोळीवर मकोका लावा
साक्षीने अभिषेक कदम आणि त्याच्या टोळीतील 10-12 लोकांनी तिला त्रास दिला. या टोळीकडून मुलींना फसवून त्यांचे फोटो घेऊन ब्लॅकमेल केलं जात असल्याचा आरोप आहे. या टोळीत दोन तरुणींचाही समावेश असल्याचे समोर आले आहे.आईने अभिषेक कदमवर मकोका लावण्याची आणि त्याला कायमस्वरूपी तुरुंगात टाकण्याची मागणी केली आहे.