घरगुती सिलिंडर महागला, उद्यापासून मोजावे लागणार जादा रुपये; किती असेल किंमत?

घरगुती सिलिंडरचे दर वाढल्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसणार आहे.

मुंबई : शेअर बाजारातील पडझड, सोन्याच्या दरात घसरण या सगळ्यात जागतिक मंदीची चर्चा होत असतानाच, देशवासियांच्या चिंतेत भर टाकणारी आणखी एक बातमी समोर आली आहे. घरगुती सिलिंडर आजपासून 50 रुपयांनी महागला आहे. पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी याबाबतची माहिती दिली आहे.

मुंबईमध्ये यामुळे नव्या सिलिंडरला आता 852.50 रुपये मोजावे लागणार आहेत. तर दिल्लीत सिलिंडरसाठी आता 853.00 रुपये मोजावे लागतील. यापूर्वी सरकारनं महिला दिनाच्या दिवशी 8 मार्च 2024 रोजी सिलिंडरच्या किंमतीत 100 रुपयांनी कपात केली होती.

प्रमुख महानगरांत काय असतील गॅस सिलिंडरचे नवे दर

1. मुंबई – 852.50
2. दिल्ली – 853.00
3. कोलकता- 879.00
4. चेन्नई- 868.50
5. जयपूर- 856.50
6. भोपाळ- 858.50
7. रायपूर- 924.00

कसे ठरतात गॅस सिलिंडरचे दर

केंद्र सरकार, तेल कंपन्या आणि आंतरराष्ट्रीय बाजारावर गॅस सिलिंडरचे दर ठरवले जातात. आंततराष्ट्रीय़ पातळीवर क्रूड ऑईलच्या आणि एलपीजीच्या किमती महागल्यास सिलिंडरचे दर वाढतात. डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य घसरले तर त्याचा परिणाम सिलिंडरच्या दरवाढीवर होतो. सरकारकडून देण्यात येणारी सबसिडी, टॅक्स याचाही परिणाम सिलिंडरच्या किमतीवर होत असतो. या सगळ्यांचा आढावा घेऊन तेल क्षेत्रातील सरकारी कंपन्या दर महिन्याला दराचे पुनरावलोकन करुन नव्या दरांची निश्चिती करत असतात. सिलिंडरचे दर हे दर महिन्याला आंतरराष्ट्रीय पातळीवर होणाऱ्या बदलांवर अवलंबून असतात.

ट्रम्प यांच्या टेरिफच्या घोषणेचा परिणाम आंतरराष्ट्रीय तेल व्यापारावरही होणार असल्याचं सांगण्यात येतंय. त्यामुळं येत्या काळात क्रूड ऑईलच्या किमतीत चढ-उतार बघायला मिळण्याची शक्यता आहे.


About Author

Smita Gangurde

Other Latest News