नवी दिल्ली: सुप्रीम कोर्टातून देशाच्या हिताशी निगडीत अनेक विषयांवर न्यायनिवाडा होत असतो. आता याच सुप्रीम कोर्टाची सुत्र महाराष्ट्राचे सुपूत्र भूषण गवई यांच्या हाती असणार आहेत. न्यायमूर्ती भूषण गवई यांनी सर्वोच्च न्यायालयात काही नवीन नियम सुरू केले, त्यांनी जनहित याचिकांच्या सुनावणीसाठी आठवड्यातून एक दिवस निश्चित केला. सर्वसामान्य लोकांसाठी त्यांनी अनेक आदर्श निर्णय दिले. अलीकडेच त्यांनी उत्तर प्रदेशात सुरु झालेले आरोपींच्या घरांवरील बुलडोझर कारवाईच्या विरोधात सरकारचा चांगलेच फटकारले होते.
14 मे रोजी घेणार शपथ:
देशाचे सरन्यायाधीश संजीव खन्ना निवृत्त होणार आहेत. न्यायमूर्ती संजीव खन्ना निवृत्त झाल्यानंतर पुढील सरन्यायाधीश कोण होणार हा प्रश्न अनेक दिवसांपासून उपस्थित केला जात होता. आता महाराष्ट्रातील प्रसिद्ध विधिज्ञ आणि आंबेडकरी चळवळीचा वारसा लाभलेले न्यायमूर्ती भूषण गवई देशाचे सरन्यायाधीश होणार आहेत. ते 52 वे सरन्यायाधीश म्हणून 14 मे रोजी शपथ घेणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू त्यांना सरन्यायाधीश पदाची शपथ देतील. भूषण गवई हे भारतीय रिपब्लिकन पक्षाचे दिवंगत नेते, माजी आमदार, खासदास आणि बिहार, सिक्कीम व केरळ राज्यांचे राज्यपाल राहिलेल्या रा.सु. गवई आणि कमलाताई गवई यांचे पुत्र आहेत.

भूषण गवईंंचं महाराष्ट्राशी नातं
न्यायमूर्ती भूषण गवई यांची नाळ महाराष्ट्राशी जोडली गेली आहे. त्यांचा जन्म अमरावती जिल्ह्यात 24 नोव्हेंबर 1960 रोजी झाला. कायद्याची पदवी घेण्यासाठी त्यांनी मुंबई गाठली होती. 1985 मध्ये गवई यांनीे वकिलीला सुरुवात केली. काही काळ त्यांनी मुंबई आणि अमरावतीमध्ये काम केले. त्यांनी उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती दिवंगत राजा एस. भोसले यांच्यासोबत काम केले. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात ते न्यायाधीश झाले. काही काळानंतर त्यांना बढती मिळाली. ते 24 मे 2019 रोजी सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश झाले. आता 14 मे 2025 रोजी ते सरन्यायाधीश पदाची शपथ घेणार आहेत. त्यांना सरन्यायाधीश म्हणून सहा महिन्यांचा काळ मिळणार आहे. ते 23 नोव्हेंबर 2025 रोजी निवृत्त होतील. या काळात त्यांच्याकडे कोणते महत्वपूर्ण खटले निवाड्यासाठी येतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
न्यायमूर्ती भूषण गवई यांनी सर्वोच्च न्यायालयात काही नवीन प्रथा सुरु केल्या. त्यांनी जनहित याचिकांच्या सुनावणीसाठी आठवड्यातून एक दिवस निश्चित केला. सर्वसामान्य लोकांसाठी त्यांनी अनेक महत्वाचे निर्णय दिले होते.