महाराजांचा अपमान करणाऱ्या आणि औरंगजेबाच्या थडग्याला ‘समाधी’ म्हणणाऱ्या शहांवर खटला चालवणार का? संजय राऊतांचा  संतप्त सवाल

अमित शहा हे कुठले ज्ञानी आहेत? ज्ञानदेव आहेत? ज्यांच्याकडून आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज शिकावे लागत आहेत.

मुंबई : रायगडावरती शिव पुण्यतिथीनिमित्त अमित शहा आले होते. त्यावेळी त्यांच्या भाषणाच्या वेळी जे काय घडले ते आम्ही पाहिले. शिंदे नाराज नको म्हणून त्यांनी शिंदेंना भाषणासाठी आमंत्रण दिले. महायुतीत एसंशि यांची लोकं नाराज आहेत. अशी चर्चा होती काल सुनील तटकरेंच्या स्नेहभोजनाला या शिंदेंची लोकं गेली नाहीत. हा त्यांचा प्रश्न आहे. पण यावरून महायुतीत एकोपा असल्याचं दिसलं  नाही. दुसरीकडे अमित शहांनी महाराजांचा एकेरी उल्लेख केला. औरंगजेबच्या थडग्याला समाधीच्या दर्जा दिला. जर हे कोणी दुसरं म्हटलं असतं तर शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी थयथयाट केला असता. मग अमित शहांना कोणती शिक्षा करणार? असा सवाल उपस्थित करत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार शरसंधान साधले.

घाणेरडे राजकारण करणारे आम्हाला शिवराय शिकवणार?

दरम्यान, पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले की, काल अमित शहांनी शिवरायांच्या समाधीसमोर छत्रपती शिवाजी महाराज काय होते हे आम्हाला सांगत होते. त्यांच्या कार्याचे माहिती देत होते. परंतु अमित शहा हे कुठले ज्ञानी आहेत? ज्ञानदेव आहेत? ज्यांच्याकडून आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज शिकावे लागते. एवढी वाईट वेळ आमच्यावर आणि महाराष्ट्रावर आलेली नाही. ज्यांनी महाराष्ट्रात घाणेरडं राजकारण केलं. ते छत्रपती शिवाजी महाराज आम्हाला काय शिकवणार? असा खोचक टोला संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना लगावला.

थडग्याला समाधीचा दर्जा दिला…

जो औरंगजेब महाराष्ट्र आणि हिंदुत्व संपवायला आला होता. त्या औरंगजेबच्या थडग्यावरून, कबरीवरून महाराष्ट्रात जे राजकारण सुरू आहे. मुख्यमंत्री फडणवीसांनी छावा चित्रपटाचे शो ठेवले होते. हा चित्रपट बघून लोकांच्या भावना तीव्र झाल्या. आणि औरंगजेबचे थडगं उखडून टाकावं अशी मागणी होत आहे. त्याच औरंगजेबच्या थडग्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडावरील समाधी समोरच अमित शहांनी समाधी असा उल्लेख केला. समाधीचा दर्जा दिला… अमित शहा औरंगजेबच्या कबरीला थडगं म्हटल्यानंतर त्यांच्या बाजूला बसलेले महाराजांचे वंशज आणि एसंशि आणि मुख्यमंत्री हे माना हलवत होते. शांत बसले होते. पण यावर त्यांनी आक्षेप का घेतला नाही? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला. थडग्याला जर कोणी समाधी असा उल्लेख केला असता तर एसंशि आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थयथयाट केला असता. औरंगजेबचे उदातीकरण करतात… त्याच समर्थन करतात.. असं म्हणून त्यांच्यावर टीका केली असते. परंतु शहांनी समाधी म्हटल्यानंतर त्यांवर सगळे शांत का? असा सवाल राऊतांनी उपस्थित केला.

महाराजांचा एकेरी उल्लेख…

कालच्या अमित शहांच्या भाषणात वारंवार अमित शहा हे कित्येक वेळा छत्रपती शिवाजी महाराज न म्हणता शिवाजी महाराज…, शिवाजी असा उल्लेख केला. हा महाराजांच्या एकेरी उल्लेख म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान नाही का? एकेरी उल्लेख करत अमित शहांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केलाय. यावर तिथे बसलेले का बोलत नाहीत. त्यांचे वंशज पण गप्प बसले होते. औरंगजेबचे थडग्याला समाधी म्हटलं मग औरंगजेबाचा जन्म गुजरातमध्ये आहे म्हणून तुमचे औरंगजेबवर प्रेम आहे का, अमित शहांचे प्रेम आहे का, मग शहांनी महाराजांचा एकेरी उल्लेख आणि थडग्याला समाधीचा दर्जा दिल्यामुळं शाहांवर खटला चालवावा,  त्यांच्यावर मुख्यमंत्र्यांनी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी खासदार संजय राऊतांनी करत अमित शहा आणि महायुतीवर जोरदार  हल्लाबोल केला.

सत्य लपत नाही…

मी जे एसंशिबाबत ट्विट केलं आहे ते सत्य परिस्थिती आहे. सत्य आहे ते सांगितले आहे. महाराष्ट्रातील एका बकऱ्याचा बळी दिला जाणार आहे. परंतु तुम्ही आम्हाला उंदीर म्हणा…, गाढव म्हणा किंवा आणखी काही म्हणा. पण सत्य लपत नाही. शेवटी गाढव हे मेहनत करतंय आणि आम्ही महाराष्ट्रासाठी मेहनत करतोय. असा टोला संजय राऊत यांनी शिंदे गटाला लागवला.

महाराजांच्या दोन गादीत भेदभाव कशाला?

रायगडवरच्या कार्यक्रमाला फक्त भाजपाची हाजी.. हाजी करणारे आणि भाजपमध्ये असलेले उदयनराजे भोसले यांना बोलावलं होते. येथे साताऱ्याची गादीचे वंशज दिसले. परंतु कोल्हापूरच्या गादीचे छत्रपती संभाजीराजे आणि छत्रपती शाहू महाराज यांना बोलवले नाही. देवेंद्र फडणवीस आणि भाजप हा महाराजांच्या दोन गादीत का भेदभाव करत आहे. महाराजांच्या दोन गादी होत्या. परंतु जे सध्या भाजपात आहेत, त्यांनाच आमंत्रित केलं. आणि जे भाजपात नाहीत त्यांना आमंत्रित केलं नाही. हा भेदभाव केल्यामुळे रायगडावरील महाराजांचा आत्मा तळतळत असेल. हे असे राजकारण अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस करत आहेत, अशी टीका संजय राऊत यांनी केली.


About Author

Astha Sutar

Other Latest News