बीड – बीड जिल्ह्यामध्ये मोरगाव नावाच्या एका लहानशा गावात एका दुर्मीळ आजारानं संपूर्ण कुटुंबाची वाताहत झाली. सारं काही सुरळीत सुरू असताना या गावातील कागदे कुटुंबावर 2015 साली दु:खाचा पहिला डोंगर कोसळला. च्या 8 वर्षांच्या मुलाचा झोपेत मृत्यू झाला. निदान शोधण्याचा प्रयत्न झाला पण हाताला काहीचं लागलं नाही. त्यानंतर 2018 साली या मुलाचे वडील बंकट कागदेही तसेच झोपेत गेले. त्यामुळं कुटुंबाची काळजी वाढली, पण मृत्यूच्या कारणाचं निदान तेव्हाही झालंच नाही. काहीच वर्षांत त्यांच्याच घरात पाच वर्षांच्या दुसऱ्या मुलीचाही झोपेतच मृत्यू झाला. या दु:खातून सावरेपर्यंत मुलीची आई असलेल्या अनिता कागदे यांच्यावर नवं संकट ओढवलं. कारण त्यांचा शेवटच्या मुलगा गजाननलाही त्रास होऊ लागला होता. गजाननला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला, सतत ताप येऊ लागला, कायम अशक्तपणा जाणवू लागला.
उपचारासाठी गाठली मुंबई
गजाननचा हा त्रास पाहून आई अनिताला आपल्या मृत पती आणि दोन मुलांच्या मृत्यूची आठवण येत राहायची. आपलं शेवटचं लेकरू तरी वाचलं पाहिजे यासाठी अनिता यांनी अनेक प्रयत्न केले. गजाननची सखोल आरोग्य तपासणी करण्यासाठी भावाची मदत घेतली आणि थेट मुंबई गाठली. बांद्रा येथील होली फॅमिली रुग्णालयातील डॉक्टर यश लोखंडवाला यांनी या दुर्मीळ आजाराचं निदान केलं. हा आजार होता दुर्मिळ मानण्यात येणारा Long QT Syndrome.

Long QT Syndrome म्हणजे काय?
हा आजार हृदयाच्या ठोक्यांशी निगडित आजार आहे. हा आजार अनुवंशिक असल्याचं सांगण्यात येतं. विशेष म्हणजे ईसीजीतही काही वेळेस या रोगाचं निदान होत नाही. हृदयाच्या ठोक्यांवर या आजाराचा परिणाम होतो, यामुळे चक्कर येऊ शकते. आजारामुळे झोपेतच मृत्यू होऊ शकतो
गजाननवर यशस्वी शस्त्रक्रिया
मुंबईत आजाराचं निदान झालं आणि डॉक्टरांनी सांगितलं की, उपचार झाले नाहीत तर गजाननचाही मृत्यू होऊ शकतो. गजाननवर शस्त्रक्रिया होणं गरजेचं होतं. ‘Cardiac Sympathetic Denervation’ नावाच्या या शस्त्रक्रियेसाठी सुमारे अडीच लाख रुपयांची गरज होती. या खर्चामुळं आईची चिंता आणखी वाढली. मात्र मदतीला काही हात सरसावले आणि पैसे उभे राहिले. 25 फेब्रुवारीला ऑपरेशन झालं आणि 1 मार्चला गजानन घरी परतला. हजार लोकांमध्ये एकाला असू शकणारा असा हा दुर्मिळ आजार, या LQTS आजारामध्ये मृत्यूचा धोका अधिक असतो. या अशा दुर्मिळ आजारानं बीडच्या एका खेडेगावातील तिघांचा बळी घेतला, त्याच घरातील चौथा मात्र सुदैवानं वेळीच निदान झाल्यानं वाचला..