सोलापूर जिल्ह्याला अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे. जिल्ह्याला अवकाळी पावसाने झोडपून काढलं आहे. अवकाळी पावसामुळे मोहोळ तालुक्यातील केळी बागांचे मोठे नुकसान झालं आहे. मोहोळ तालुक्यातील पापरी गावातील अनेक शेतकऱ्यांच्या केळी बागा पूर्णपणे जमीनदोस्त केळी बागांसोबतच ऊस, आंबा, पेरू, चिकू अशा पिकांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. वादळी वाऱ्यासह पडलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकरी राजा हतबल झाला आहे. शासनाने त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
केळी बागांचं नुकसान, शेतकरी अडचणीत
सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ, करमाळा, पंढरपूर या भागात केळी बागांचे क्षेत्र मोठे आहे. केळीची बागायती शेती हे या भागांतील शेतकऱ्यांचे उत्पन्नाचे प्रमुख साधन मानले जाते. अशा परिस्थितीत या भागातील बागाच जमीनदोस्त झाल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहे. काही बागांची तोडणी देखील सुरू होती. निर्यातक्षम केळी उत्पादनासाठी हा भाग प्रसिद्ध आहे. मात्र, बुधवारच्या पावसाने मोठे नुकसान झाले. अवकाळी पावसाचा केळी बागांना तडाखा बसल्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

केळीला चांगला दर मिळत असताना शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास नैसर्गिक संकटामुळे हिरावला आहे. शिवाय खते, बी बियाणे, औषधे, मजुरी यात गुंतवलेले भांडवलही बुडाले आहे. पूर्वमोसमी पाऊस आगामी काळात देखील कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील काळात आणखी जास्तीच नुकसान होण्याची शक्यता आहे. परिणामी शेतकरी आता सरकारी मदतीच्या भरोशावर आहेत, मोडलेला आत्मविश्वास आता सरकारी आधारामुळेच वाढेल, अशी भावना काही शेतकरी व्यक्त करत आहे.
राज्याला पावसाचा इशारा कायम
राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पूर्वमोसमी पाऊस सुरु झाला आहे. राज्यात 15 मे रोजी नाशिक आणि सातारा जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. नाशिक आणि सातारा जिल्ह्यामध्ये गारपिटीचीही शक्यता आहे. याशिवाय अहमदनगर आणि पुणे जिल्ह्यातही पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. सध्या कोकण किनारपट्टी आणि आजुबाजूच्या परिसरात चक्राकार वारे वाहत आहेत. पश्चिम बंगालपासून विदर्भ, तेलंगणा ते रायलसीमापर्यंत आणि विदर्भ, मराठवाड्यापासून केरळपर्यंत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. कोकणातील रत्नागिरी, रायगडमध्ये पावसाची नोंद झाली. याशिवाय नाशिक, पुणे, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, लातूर, नांदेड, धाराशिव आणि विदर्भात नागपूरमध्येही पावसाची नोंद झाली आहे.