मुंबई- राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या ठाकरे बंधुंच्या एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा उधाण आलंय. आमच्यातले वाद हे महाराष्ट्र हितापेक्षा मोठे नाहीत, असं वक्तव्य राज ठाकरेंनी केलंय. तर एकत्र यायचं असेल तर आधी शिंदेंची शिवसेना आणि भाजपाशी असलेली मैत्री तोडा, असं उद्धव ठाकरे म्हणालेत. या दोन्ही नेत्यांच्या वक्तव्यांनंतर ठाकरे बंधुंच्या एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण आलंय.
मनसेला वाईट ठरवून एकत्र येऊ शकणार नाही, अशी प्रतिक्रिया मुंबई मनसे अध्यक्ष संदीप देशपांडेंनी दिलीय. तर युतीबाबत सकारात्मक असल्याचं ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले आहेत.

काय म्हणालेत संदीप देशपांडे
अटीशर्तीवर आणि मनसेला वाईट ठरवून एकत्र येऊ शकणार नाही, असं परखड मत संदीप देशपांडे यांनी मांडलंय. देवेंद्र फडणवीस आणि ेकनाथ शिंदेंना जेवायला बोलावू नका, असं उद्धव ठाकरे सांगतात, मग आदित्य ठाकरे चंद्रकांत पाटील यांच्यासोबत चॉकलेट खातात, हे चालतं का, असा सवाल संदीप देशापांडेंनी विचारलाय.
ठाकरेंच्या शिवसेनेनं आत्तापर्यंत भाजपाला धोका दिला, आता काँग्रेस आणि शरद पवार राष्ट्रवादीला धोका देण्याच्या तयारीत ते आहेत, त्यांच्यावर विश्वास कसा ठेवायचा, असा प्रश्न कार्यकर्ता म्हणून आपल्याला पडल्याचं त्यांनी सांगितलंय. युती करायची की नाही याचा निर्णय राज ठाकरेच घेतील, असंही संदीप देशपांडेंनी स्पष्ट केलंय.
काय म्हणालेत संजय राऊत
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यांनंतर संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत याबाबत सकारात्मक असल्याचं म्हटलय. राज ठाकरेंनी आता मन मोकळं केलं आहे. त्यामुळं भूमिका सकारात्मक असून वेट अँड वॉचचं धोरण असल्याचं राऊत म्हणालेत. संयुक्त महाराष्ट्र समितीत अनेकांनी आपले वाद बाजूला ठेऊन महाराष्ट्राच्या हिताची भूमिका घेतली होती. त्याचप्रमाणे राज ठाकरे महाराष्ट्र हिताची भूमिका घेत असतील तर त्याला नाकारण्याचा करंटपणा आम्ही करणार नाही, असंही राऊत म्हणालेत.
मात्र पडद्याआडून मराठी माणसाचे नुकसान व्हावे, अशा लोकांच्या पंगतीला आम्ही बसणार नाही, असंही राऊत म्हणालेत. अशा माणसांना घरात घेणार नाही, असंही राऊतांनी सांगितलंय.
कोणत्या ठाकरेंना जास्त गरज?
विधानसभा निवडणुकांनंतर आता राज्यातील महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आहेत. त्यात मुंबई महापालिकेची निवडणूक उद्धव ठाकरेंसाठी निर्णायक ठरणार आहे. मुंबई महापालिकेची सत्ता ठाकरेंच्या शिवसेनेच्या हातातून गेली, तर पक्षासमोरचं प्रश्नचिन्ह उपस्थित होईल. विधानसभेला झालेला मविआचा पराभव पाहता मुंबई महापालिका निवडणुका ठाकरेंची शिवसेना स्वबळावर लढण्याच्या तयारीत आहे. महायुतीत भाजपा आणि शिंदेंच्या शिवसेनेनंही जय्यत तयारी केलीय. ठाकरेंच्या शिवसेनेला गेल्या दोन अडीच वर्षांत मुंबईत चांगलंच खिंडार पडलं असून, त्यातील अनेक माजी नगरसेवक हे आता शिंदेंसोबत आहे. भाजपा आणि शिंदेंच्या शिवसेनेच्या समोर ठाकरेंची शिवसेना स्वबळावर कितपत टिकाव धरु शकेल, याबाबत साशंकता आहे. अशात आता ठाकरे बंधुंच्या मनोमीलनाची चर्चा पुन्हा सुरु झाल्यानंतर उद्धव ठाकरेंनी लागलीच टाळीसाठी हात पुढे केलाय.
राज ठाकरे यांचा विचार केल्यास त्यांच्यासाठी गमावण्यासारखं फारसं काही नसल्याचं सांगण्यात येतंय. विधानसभा आणि लोकसभेत एकही जागा आली नसली तरी त्यांचे सत्ताधारी महायुतीतल्या नेत्यांशी चांगले संबंध आहेत. मुंबई महापालिका निवडणुकीत मनसेची दीड ते दोन टक्के मतं निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत आता टाळी द्यायची की नाही हा निर्णय राज ठाकरे त्यांच्या शर्तीवर करतील, असं सांगण्यात येतंय. त्या तुलनेत ठाकरेंच्या शिवसेनेला जास्त गरज असल्याचीही चर्चा आहे.