Raj Thackeray-Uddhav Thackeray Reunion : उद्धव आणि राज ठाकरे बंधू यांच्या मनोमिलनाची चर्चा पुन्हा एकदा सुरू झालीय. या दोन्ही चुलत भावांची महाराष्ट्राच्या हितासाठी एकमेकांसोबत येण्याचे संकेत दिले आहेत. राज ठाकरेंच्या महाराष्ट्र हितासाठी एकत्र येण्याच्या वक्तव्यावर, उद्धव ठाकरेंनीही लागलीच प्रतिक्रिया दिल्यानं या चर्चांना उधाण आलंय, त्यानंतर राज्याच्या राजकारणात आणि सर्वसामान्य मराठी माणसांत हा चर्चेचा विषय ठरतोय.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा वारसदार कोण, यावरुन या दोन्ही चुलत भावंडांत वाद निर्माण झाला. यातून पुढे फारकत आणि मध्येमध्ये टाळीचे प्रयत्न असे प्रयोगही झालेत. नेमकं काय घडलंय हे जाणून घेऊयात.

25 वर्षांपासूनचा संघर्ष
सुमारे पंचवीस वर्षांपूर्वी 1990 साली ठाकरे बंधू त्यावेळी राजकारणात सक्रिय झाले होते. उद्धव ठाकरे यांच्या कितीतरी आधी म्हणजे 1990 च्या दशकाच्या सुरुवातीपासून राज ठाकरे राजकारणात सक्रिय होते. उद्धव ठाकरे तेव्हा फोटोग्राफीचा छंद जोपासत होते, राजकारणात सक्रिय नव्हते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांसारखंच व्यक्तिमत्व असणारे राज ठाकरे हेच सर्वांना वारसदार वाटत होते. 90 च्या दशकाच्या अखेरीस उद्धव ठाकरे हळूहळू राजकारणात सक्रिय झाले. रमेश किणी हत्या प्रकरणात राज ठाकरेंवर आरोप झाल्यानंतर राज काहीसे बाजूला पडले आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे हळूहळू अधिक जबाबदारी येऊ लागली. यानंतर दोन्ही नेत्यांतील दरी वाढण्यास सुरुवात झाली.
1992 च्या मुंबई महापालिका निवडणुकीची जबाबदारी उद्धव ठाकरेंकडे होती. त्यावेळी राज ठाकरेंच्या समर्थकांना तिकिटं नाकारली गेल्याच्या तक्रारी होत्या. राज समर्थकांना डावलल्यानं त्यांच्यात नाराजी वाढली होती. त्यातच 2003 मध्ये शिवसेनेच्या महाबळेश्वर अधिवेशनात उद्धव ठाकरे यांची कार्याध्यक्षपदी निवड झाली. राज ठाकरे यांनीच हा प्रस्ताव मांडला आणि बाळासाहेब ठाकरेंच्या वारसदारावर शिक्कामोर्तब झालं. 2005 मध्ये नारायण राणे यांनी शिवसेनेत बंड केलं. त्यावेळी राज ठाकरेंनी नारायण राणेंच्या विरोधात आक्रमक भूमिका घेणं टाळलं. राणेंच्या बंडानंतर सहा महिन्यांतच राज ठाकरेंनीही शिवसेना सोडण्याची घोषणा केली. माझ्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरलंय, अशी टीका करत राज ठाकरेंनी पक्ष सोडला. पक्षातील भवितव्याबाबत काळजी असल्यानं राज ठाकरेंनी हा निर्णय घेतल्याचं सांगण्यात आलं. यापूर्वी राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना अनेकदा जाहीरपणे टीकेचं लक्ष केलं. कार्याध्यक्षपदासाठी उद्धव यांचं नाव सूचवून आपण आपल्या पायावर धोंडा पाडून घेतला असं राज ठाकरे यांनी एकदा जाहीरपणे म्हटलं होतं. राज ठाकरेंनी त्यांची घुसमट शिवसेनाप्रमुखांना पत्र लिहून कळवली होती. राज ठाकरे यांनी आधी पुणे, नाशिकची जबाबदारी मागितली होती. ती देण्याचं बाळासाहेब ठाकरेंनी मान्य केलं. राज यांनी नंतर मुंबईची जबाबदारी मागितली आणि ती देता येणार नाही असं आपण सांगितल्याचं बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं होतं. पुढे मराठवाडा, विदर्भ मागितला, तेव्हा राज यांची चाल वेगळी वाटली असं शिवसेनाप्रमुख मुलाखतीत म्हणाले होते. एकूणच शिवसेनेत उद्धव आणि राज ठाकरे यांच्यात वर्चस्वासाठीच संघर्ष झाला आणि त्यातूनच राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडले हे स्पष्ट होतं. पुढे राज ठाकरे यांनी मनसे स्थापन केली आणि उद्धव ठाकरेंविरोधात थेट संघर्ष केला.
दोन्ही भावंडांनी मिळवलेल्या यशाची चर्चा
एकमेकांपासून दुरावलेले भाऊ दोन स्वतंत्र पक्षांचे प्रमुख बनले. मात्र त्यांच्या कारकीर्दीत त्यांच्या पक्षांनी वेगवेगळ्या कामगिरी केल्या. 2009 मध्ये राज ठाकरेंना चांगलं यश मिळालं. मनसेचे 13 आमदार निवडून आले. तर बाळासाहेब ठाकरेंच्या निधनानंतर 2014 मध्ये शिवसेनेनं स्वबळावर लढून 63 आमदार निवडून आणले. भाजपच्या साथीनं 2014 आणि 2019 च्या लोकसभेतही उद्धव ठाकरेंना मोठं यश मिळालं. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील ही मोठी कामगिरी होती. त्यानंतर 2019 मध्ये विधानसभेत 56 आमदार निवडून आल्यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले ही त्यांचं सर्वात मोठं यश होतं. एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात 2022 मध्ये शिवसेना फुटली. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंचे 9 खासदार निवडून आले. मात्र विधानसभेत केवळ 20 आमदार विजयी झाले. दुसरीकडे 2009 मध्ये 13 आमदार निवडून आणणाऱ्या राज ठाकरेंच्या मनसेला 2014 च्या विधानसभा निवडणुकीपासून मात्र उतरती कळा लागली. त्यांचा जेमतेम एकेक आमदार निवडून आला. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत मनसेनं भाजपा महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला. तर स्वबळावर विधानसभा लढवली. मात्र पहिल्यांदाच राज ठाकरेंचा एकही आमदार निवडून आला नाही.
टाळीचे कधी प्रयत्न झाले?
या सगळ्या संघर्षात ठाकरे बंधू एकत्र येतील अशा चर्चाही झडल्या, त्याच्या चर्चाही झाल्या. यापूर्वी तीन वेळा असा प्रयत्न झाला मात्र त्यात यश मिळू शकलेलं नाही. 2014, 2017 आणि 2019 साली हे प्रयत्न झाले, मात्र त्याची चर्चा झाली, त्यात यश मिळू शकलं नाही. या तिन्ही वेळा केवळ चर्चा झाल्या मात्र त्यात यश मिळू शकलं नाही.
कटुता वाढली, आता काय होणार?
दोन्ही भाऊ एकमेकांच्या संघर्षातून दूर गेले. सध्या दोघांचीही राजकीय ताकद कमी झालीय दोघांसाठीही राजकीय अस्तित्वाची लढाई सुरू असल्यानं एकमेकांना टाळी देण्याची भाषा सुरू झालीय. तरीही प्रत्यक्षात दोघं एकत्र येतील का याबाबत राजकीय वर्तुळात मात्र साशंकता व्यक्त होतेय.