मुंबई – राज्याच्या राजकारणात पु्न्हा एकदा ठाकरे बंधू एकत्र येणार का? यावर शनिवारपासून राजकीय वर्तुळात चर्चा रंगत आहेत. वेगवेगळी मतं आणि तर्कवितर्क लढविले जात आहेत. “माझ्यासाठी महाराष्ट्र खूप मोठा आहे, वाद, भांडणं ही खूप लहान गोष्ट आहे”, असं राज ठाकरेंनी एका मुलाखतीत म्हटल्यानंतर उद्धव ठाकरेंकडूनही याला सकारात्मक प्रतिसाद आला आहे. “आमच्यात वाद, भांडणं कधी नव्हतीच…, चला मिटवली”, असं उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे. यानंतर राज-उद्धव हे दोन ठाकरे बंधू पुन्हा एकदा येणार का? यावर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. एकत्र येण्यासाठी आमच्याकडून कोणत्याही अटी, शर्थी नाहीत, राज-उद्धव हे महाराष्ट्र हितासाठी एकत्र आले पाहिजेत, असं खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. आज त्यांनी माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.
महाराष्ट्राच्या शत्रूंना जवळ करु नका…
दरम्यान, महाराष्ट्रातील गावातील शेवटच्या माणसालाही वाटतंय की, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावे. महाराष्ट्र हिताच्या फॉर्मुल्यात भाजपा किंवा महाराष्ट्र द्रोह्यांच्या आणि शत्रूंच्या पंगतीत बसू नका. महाराष्ट्र हिताच्या जे आड येतील, त्यांना घरातही घेऊ नका. अशा लोकांची संगत नको. एवढेच उद्धव ठाकरेंची भूमिका आहे. मनसेकडून कोण काय म्हणतंय, याला मी उत्तर देणार नाही. जर राज ठाकरे बोलले तर आम्ही समजू, असं राऊत म्हणाले. आपण मुरारजी देसाई किंवा नरेंद्र मोदी यांचे घरात फोटो लावतो का? कारण हे दोन्ही माणसं महाराष्ट्राचे शत्रू आहेत. आम्ही राज ठाकरे यांच्या भूमिकेचं स्वागत केलेलं आहे. आणि याला उद्धव ठाकरेंनीही सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे.

राज-उद्धवच निर्णय घेऊ शकतात…
महाराष्ट्र हितासाठी… मराठी माणसासाठी एकत्र येताना किंतू, परंतू कशाला हवेत. अटी शर्थीवर वाद घालणे हे महाराष्ट्र द्रोह्यांच्या पथ्थ्यावर पडेल. महाराष्ट्र हितासाठी आणि मराठी माणसासाठी आपण पुढे पाऊल टाकले पाहिजे, पण आता हे दोन भाऊ एकत्र येऊ नये असं काही लोकांना वाटत आहे. उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्र हितासाठी कोणतीही अट ठेवलेली नाही. फक्त महाराष्ट्राचे जे शत्रू आहेत, त्यांच्याशी हातमिळवणी करायचे नाही एवढेत ते म्हणालेत. दोन्ही बाजूनी पाऊल पडले आहे ते कुठे कमी आहे का, पुढे सकारात्मक चर्चा होईल. जो निर्णय घ्यायचा आहे, तो राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे घेऊ शकतात. तो तिसरा कोणीही नाही. आणि यामध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हेच भूमिका मांडतील. तिसरे कोणीह गरज नाही यावर मत व्यक्त करण्याची, असं राऊत म्हणाले.
शिंदेंचा संताप होऊ शकतो…
राज-उद्धव एकत्र येणार असल्याची चर्चा आहे, असं शिंदेंना विचारले तर एकनाथ शिंदे संतापले यावर बोलताना राऊत म्हणाले की, शिंदेचा संताप होऊ शकतो. फडणवीसांचा ही आतल्या आत संताप होत असेल. भाजपाचा आंनद कसा असतो आम्हांला माहित आहे. काही लोकांना हे दोन भाऊ एकत्र नको आहेत. म्हणून काटे मारत असतात. फक्त महाराष्ट्र हिताच्या फॉर्मुल्यात भाजपा आणि महाराष्ट्राचे शत्रू ही लोकं बसत नाहीत. मग ही अट कुठे आहे. ही लोकभावना आहे. राज-उद्धव यांच्यावर बोलण्याची शिंदे गटाची गरज काय? तुमचे अमित शहा हे पक्षप्रमुख आहेत, त्यांचे तुम्ही ऐका, . तुम्ही आता तुमचे बघा… असा हल्लाबोल संजय राऊतांनी शिंदे गटावर केला. नरेश म्हस्केंचे आयुष्य भाजपाला मस्का लावण्यात गेले, अशी बोचरी टीका राऊतांनी खासदार नरेश म्हस्केंवर केली.
दोन भावांनी एकत्र यावे ही सर्वाची इच्छा…
दोन ठाकरे नेते हे शेवटी भाऊच आहेत. ते एकत्र यावेत ही सर्वाची इच्छा आहे. दोन प्रमुख ठाकरे घरातील नेते आणि दोन भाऊ महाराष्ट्र हिसातासाठी एकत्र येत असतील, तर फार वाद, अटी किंवा शर्थी याव्यात असं मला वाटत नाही. मी बाळासाहेब ठाकरेंपासून आदित्या ठाकरेंपर्यंत काम केलेलो आहे. राज ठाकरे यांच्यासोबत माझे जूने संबंध आहेत. मी त्यांच्यासोबत काम केलेले आहे. पण त्यांनी एकत्र यावे हे तुम्हाला नको आहे का? तुम्हाला काही अडचण आहे का? असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केला.