Ajit Pawar : राज्यातील आज पहिल्या महसूल लोक अदालतीचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते पुण्यात पार पडले. दरम्यान, नागपूर जिल्ह्यात महसूल विभागाला अत्याधुनिक बहुउद्देशीय (मल्टिपर्पज) वाहने देण्याचा निर्णय यापूर्वी शासनाने घेतला असून राज्यातील छत्रपती संभाजीनगर, पुणे, नाशिक, अमरावती, कोकण महसूली विभागीय मुख्यालयांच्या ठिकाणीदेखील यावर्षी अशी वाहने महसूल विभागाला देण्यात येतील, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. राज्यात पहिल्यांदाच पुणे जिल्ह्यात महसूल लोक अदालतीच्या उद्घाटन पार पडले. यावेळी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेही उपस्थित होते.
गावागावात वाद संमतीने, तडजोडी मिटवले जातील
दरम्यान, पुढील अनेक वर्षे चालणारे खटले थांबणार असून त्यातून जनतेच्या आणि प्रशासनाच्या वेळेची, पैशाची आणि श्रमाची बचत होणार आहे. आजच्या महसूल अदालतीत जवळपास ११ हजार महसूली दावे तडजोडीने निकाली निघणार असल्याने महसूल विभाग आणि न्याय व्यवस्थेवरीलही ताण कमी होणार आहे. असं अजित पवार म्हणाले. तसेच वाद संमतीने किंवा तडजोडी मिटल्याने गावातील भांडणे संपतील, जमिनीच्या वादामुळे कलुषित झालेली मने स्वच्छ होतील. घरात, गावात शांततेचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण होईल, असंही पवार म्हणाले.

उर्वरित २० हजार दावेही निकाली काढावेत
दुसरीकडे उर्वरित २० हजार दावेही अशा महसूल अदालतीचे आयोजन करुन तडजोडीने निकाली काढावेत, असेही पवार म्हणाले. तर अधिकाऱ्यांकडून चांगल्या कामाची अपेक्षा करत असताना त्यांनाही पायाभूत सुविधा पुरविल्या पाहिजेत, त्यादृष्टीने पहिल्या टप्प्यात सर्व विभागीय आयुक्तालयांच्या ठिकाणी आणि त्यानंतर टप्प्या-टप्प्याने इतर जिल्ह्यांतील महसूल विभागाला वाहने उपलब्ध करून दिली जातील. तर प्रशासन आपली जबाबदारी बजावत असताना जे गुन्हेगारीवृत्तीने काम करतात अशांविरोधात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार (मकोका) कारवाई केली पाहिजे. त्यादृष्टीने कायद्यात बदल करणे गरजेचे आहे, असेही अजित पवार म्हणाले.