मुंबई : राज्यातील मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीच्या माध्यमातून गरजू रुग्णांना मोठा आर्थिक दिलासा मिळतो. यातून कित्येक रुग्णांवर मोफत उपचार करण्यात आले आहेत. दरम्यान, या योजनेबाबत एक महत्वाची अपडेट समोर येत आहे. दरम्यान, मुख्यमंत्री वैद्यकीत सहायता निधीची संपूर्ण प्रणाली व्हॉट्सॲपवर उपलब्ध करून देण्यात यावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधितांना दिले. राज्य शासनाच्या विविध सेवा व्हॉट्सअपवर उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने मेटासोबत सामंजस्य करार केला आहे. त्यामुळं मुख्यमंत्री वैद्यकीत सहायता निधीची सेवाही ‘व्हॉट्सअप’वर उपलब्ध करुन देण्यात यावी असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
लाभ एकाच अर्जाद्वारे द्यावा…
दरम्यान, पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, आरोग्यविषयक सर्व योजनांचा लाभ एकाच अर्जाद्वारे देण्यात यावा, आणि आरोग्यविषयक सर्व योजनांसाठी एकच पोर्टल आणि अर्ज उपलब्ध करून देण्याचे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. त्यामुळं आता राज्यातील नागरिकांना आता मुख्यमंत्री सहायता निधीबाबत सर्व सेवा व्हॉट्सॲपच्या माध्यमातून उपलब्ध होणार असल्याने यात अधिक पारदर्शकता येईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री सहायता निधीबाबत सह्याद्री अतिथीगृह येथे बुधवारी बैठक झाली. या बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार, मुख्य सचिव सुजाता सौनिक मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक आदी उपस्थित होते.

‘सीएसआर’ मधून निधी घ्यावा…
रुग्णसेवेत येत असलेल्या अडचणींवर मात करीत रुग्ण सेवेसाठी निधीचा जास्तीत जास्त उपयोग करावा. यासाठी रुग्णालयांची संलग्नता वाढवून जास्तीत जास्त रुग्णालये पॅनल करण्यात यावीत. तसेच मुख्यमंत्री सहायता निधीसाठी आर्थिक तरतूद वाढविण्यासाठी ‘सीएसआर’ (कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी) मधून निधी घ्यावा. मुख्यमंत्री सहायता निधीची सेवा अधिकाधिक लोकाभिमुख करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग करण्यात यावा. विशेष म्हणजे मुख्यमंत्री सहायता निधी, प्रधानमंत्री आयुष्यमान भारत योजना, महात्मा फुले जन आरोग्य योजना यापैकी रुग्णाला कुठल्या योजनेचे लाभ मिळेल, यापूर्वी घेतलेला लाभ, कुठल्या आजारावर किती लाभ मिळाला याबाबत सर्व माहिती पोर्टलवर असावी. दरम्यान, राज्यात 31 मार्च 2025 पर्यंत 7 हजार 658 रुग्णांना 67 कोटी 62 लाख 55 हजार रुपयांची आर्थिक मदत मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाच्या माध्यमातून देण्यात आली असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.