नाशिक – आता शाळांमध्ये विद्यार्थअयांसोबत शिक्षकही गणवेशात दिसणार आहेत. जूनपासून सुरु होणाऱ्या नव्या शैक्षणिक वर्षांत शिक्षकांना गणवेशात शाळांमध्ये यावं लागणार आहे. शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनीही ही माहिती दिली आहे. या गणवेशासाठी शिक्षकांना काही निधी खारीच्या वाट्याच्या रुपात दिला जाणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय.
देशबरात नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी या शैक्षणिक वर्षापासून होणार आहे. त्रिभाषा सूत्र यामुळं सर्व राज्यांना स्वीकारावं लागणार आहे, पहिलीपासून मातृभाषा, हिंदी आणि इंग्रजी या तिन्ही भाषांचा समावेश असणार आहे. यावरुन विरोध असतानाच शिक्षकांच्या नव्या ड्रेसकोडचं वक्तव्य शिक्षणमंत्र्यांनी केल्यानं आता यातून नवा निर्माण होण्याची शक्यता नाकारता येणारी नाही

शिक्षकांमध्ये ड्रेसकोडवर काय प्रतिक्रिया?
जूनपासून शिक्षकांना ड्रेसकोड लागू होणार, याचं सूतोवाच शिक्षणमंत्र्यांनी केल्यानंतर शिक्षकांमध्ये याबाबत प्र्तिक्रिया उमटू लागल्या आहेत. शिक्षकांचे अनेक प्रश्न प्रलंबित असताना, त्यावर तोडगा काढण्याऐवजी शिक्षकांना ड्रेसकोड लागू करण्याची काय गरज, असा सवाल विचारण्यात येतोय. नको त्या बाबींवर सरकार खर्च करत असल्याची टीकाही काही शिक्षकांनी केली आहे.
विनाअनुदानित, अंशत: अनुदानित शाळांना अद्याप अनुदान देण्यात आलेले नाही. फुले-शाहू आश्रमशाळांत असलेले शिक्षक 17 वर्षांपासून विनापगारी नोकरी करतायेत. त्यातील एका शिक्षकानं नुकतीच आत्महत्या केल्याचा प्रकार बीडमध्ये घडला होता. हे गंभीर प्रश्न सोडवण्याऐवजी शिक्षकांना ड्रेसकोड लावून नको त्या ठिकाणी सरकार निधी खर्च का करतेय, असा सवाल विचारण्यात येतोय.
शैक्षणिक गुणवत्तेत काय फरक पडणार?
शिक्षकांना गणवेश दिल्यानं विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत काय फरक पडणार, अशीही विचारणा करण्यात येतेय. कमी पटसंख्येचं कारण देत अनेक शाळा सध्या बंद होतायेत, अनेक शाळांमध्ये आवश्यक सोयीसुविधाही उपलब्ध नाहीत. त्याकडे लक्ष देण्याची अधिक गरज असल्याचं मत उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केलंय.
ड्रेसकोडवरुन नवा वाद रंगण्याची चिन्हं
शिक्षकांना ड्रेसकोड दिल्यास याचा राज्यभरातील शिक्षक आणि शिक्षक संघटनांकडून विरोध होण्याची शक्यता आहे. ड्रेसकोड लागू केला तरी त्याचा वापर होईल का, याबाबत साशंकता व्यक्त करण्यात येतेय. मूळ शिक्षणक्षेताली प्रश्न बाजूला पडून यावरुनच येत्या काळात वाद होईल, असे संकेत मिळतायेत.