पाणी प्रश्नासाठी शिवसेना (ठाकरे गट) आक्रमक, पालिका कार्यालयावर काढला हंडा मोर्चा

लोकशाहीमध्ये सगळ्यांना मोर्चा काढण्याचा अधिकार आहे. निषेध करण्याचा अधिकार आहे. पण या ठिकाणी ज्या ज्या पद्धतीने आम्ही मोर्चा काढतो, तेव्हा अगोदर पोलीस स्टेशनला सांगून अलर्ट करून आमचे मोर्चे दाबण्याचा प्रयत्न केला जातोय.

मुंबई – आता एप्रिल महिना सुरू आहे. पावसाला अजून दोन महिन्याचा अवधी असताना, मुंबईसह राज्यातील विविध भागात पाणी प्रश्न गंभीर होत चालला आहे. मुंबईत नुकताच टँकर चालकांनी संप केला होता. हा संप त्यांनी दोन दिवसापूर्वी मागे घेतला आहे. परंतु चार दिवस चाललेल्या संपात मुंबईकरांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले होते. दरम्यान, मुंबईतील पाणी प्रश्नावरून शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाला असून, मागील दोन दिवसांपासून पालिका विभागीय कार्यालयावर शिवसेनेकडून हंडा मोर्चा काढण्यात येत आहे. बुधवारी कुर्ला येथे विभागप्रमुख सोमनाथ सांगळे, यांनी पाणी प्रश्नावरुन पालिका विभागीय कार्यालयावर हंडा मोर्चा काढला.

भविष्यात यापेक्षा मोठा हंडा मोर्चा काढू….

दरम्यान, आम्ही जल अधिकारी यांना भेटून पाणी जास्त वेळ सोडण्यासाठी सूचना केल्या आहेत. यासाठी निवेदन दिले आहे. जर पाणी कमी आले तर भविष्यात यापेक्षा मोठा हंडा मोर्चा काढू, अशा इशारा आम्ही दिला असल्याचे विभागप्रमुख सोमनाथ सांगळे यांनी सांगितले. दरम्यान, मुंबईतील विविध भागात चुनाभट्टी, लालबहादूर शास्त्रीनगर, कुर्ली अशा बऱ्याच भागांमध्ये बिल्कुल पाणी येत नाहीय. यासाठी या प्रशासनाला जाग आणण्यासाठी आम्ही लोकांनी या ठिकाणी उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आदित्य यांच्या सूचनेवरून या ठिकाणी या विभागामध्ये विभाग क्रमांक सहाच्या वतीने भव्यदिव्य असा हंडा मोर्चा काढला आहे. पाणी कमी आले तर भविष्यात यापेक्षा मोठा हंडा मोर्चा काढणार, असंही विभागप्रमुख सोमनाथ सांगळे यांनी सांगितले.

मोर्चे दाबण्याचा प्रयत्न…

दुसरीकडे लोकशाहीमध्ये सगळ्यांना मोर्चा काढण्याचा अधिकार आहे. निषेध करण्याचा अधिकार आहे. पण या ठिकाणी ज्या ज्या पद्धतीने आम्ही मोर्चा काढतो, तेव्हा अगोदर पोलीस स्टेशनला सांगून अलर्ट करून आमचे मोर्चे दाबण्याचा प्रयत्न केला जातोय. थोडक्यात काय तर जनतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. सरकारने हुकूमशाही सुरू केली आहे. आम्ही जल अधिकाऱ्यांना भेटल्यानंतर पाणी प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्याचे त्यांनी आम्हाला आश्वासन दिले आहे. आणि त्याचा निश्चित आम्ही पाठपुरावा करू, आमची मागणी पूर्ण नाही झाली तर पुन्हा आम्ही या ठिकाणी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असं सांगळे म्हणाले.


About Author

Astha Sutar

Other Latest News