‘हिंदी भाषेची सक्ती खपवून घेणार नाही’, राज ठाकरे गरजले

हिंदी भाषेची सक्ती महाराष्ट्रातच का ? ही अशी हिंदीची सक्ती दक्षिणेच्या राज्यात कराल का ? असा सवालही राज ठाकरेंनी केला आहे. पुढे ते म्हणाले, आणि करून तर बघा, तिथली सरकारंच पेटून उठतील.

मुंबई : राज्यामध्ये केंद्र सरकारच्या त्रिभाषा सुत्रानुसार राज्य सरकारने पहिलीपासून हिंदी भाषेची राज्य शालेय अभ्यासक्रम सक्ती केली आहे.या सक्तीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समर्थन केले आहे. हिंदी भाषेच्या सक्तीला मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आपल्या सोशल मिडिया अकाऊंटवरून पोस्ट करत विरोध केला आहे.

राज ठाकरे यांनी म्हटले आहे की, केंद्र सरकारचं सध्या जे सर्वत्र ‘हिंदीकरण’ करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, ते या राज्यात आम्ही यशस्वी होऊ देणार नाही. हिंदी ही काही राष्ट्रभाषा नाही. ती देशातील इतर भाषांसारखी एक राज्यभाषा आहे. ती महाराष्ट्रात का म्हणून पहिलीपासून शिकायची ? तुमचं त्रिभाषेचं सूत्र जे काही आहे ते सरकारी व्यवहारांपुरतंच मर्यादित ठेवा, त्याला शिक्षणापर्यंत आणू नका. या देशात भाषावार प्रांतरचना झाली, आणि ती इतकी वर्ष टिकली. पण आत्ताच ही दुसऱ्या प्रांताची भाषा इथे महाराष्ट्रावर लादण्याचे प्रकार का सुरु झालेत? भाषावार प्रांतरचनेच्या तत्वालाच हरताळ फासला जात आहे.

इतर भाषांना विरोध नाही मात्र…

महाराष्ट्रात जसा मराठीचा सन्मान इतर भाषिकांकडून राखला गेला पाहिजे, तसा सन्मान इतर राज्यात त्या भाषेचा सर्व भाषिकांकडून राखला गेला पाहिजे. अगदी इतर राज्यात राहणाऱ्या मराठी जनांनी त्या राज्याची भाषा आपली मानली पाहिजे हा आमचा आग्रहच आहे. पण हे सोडून या देशाची भाषिक परंपराच खिळखिळी करणार असाल तर ते आम्हाला मान्य नाही, असे राज ठाकरेंनी आपल्या पोस्टमधून ठणकावले आहे.

हिंदू आहोत पण हिंदी नाही

आम्ही हिंदू आहोत पण हिंदी नाही आहोत. महाराष्ट्रावर हिंदीकरणाचा मुलामा द्यायचा प्रयत्न कराल तर महाराष्ट्रात संघर्ष अटळ आहे. या सगळ्याकडे पाहिलं तर लक्षात येतं की सरकार हा संघर्ष मुद्दामून घडवत आहे. येणाऱ्या आगामी निवडणुकांमध्ये मराठी विरुद्द मराठीतर असा संघर्ष घडवून स्वतःचा फायदा काढून घेण्यासाठी हा सगळा अट्टाहास सुरु आहे? या राज्यातील मराठीतर भाषिकांनी पण सरकारचा हा डाव समजून घ्यावा. त्यांना तुमच्या भाषेबद्दल विशेष प्रेम आहे असं काही नाही. त्यांना तुमची माथी भडकवून स्वतःची राजकीय पोळी भाजून घ्यायची आहे, असेही राज यांनी म्हटले आहे.

सक्ती दक्षिण राज्यात वापराल का?

बरं हिंदी भाषेची सक्ती महाराष्ट्रातच का ? ही अशी हिंदीची सक्ती दक्षिणेच्या राज्यात कराल का ? असा सवालही राज ठाकरेंनी केला आहे. पुढे ते म्हणाले, आणि करून तर बघा, तिथली सरकारंच पेटून उठतील. इथलं राज्यातील सरकार आणि त्यातील घटक पक्ष निमूटपणे हे सगळं खपवून घेतात म्हणून इथे ही सक्ती केली जात आहे. बाकीच्यांचं आम्हाला माहीत नाही आणि आम्हाला देणंघेणं पण नाही, पण महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे खपवून घेणार नाही. आज भाषा सक्ती करत आहेत, उद्या इतर सक्तीचे फतवे काढतील. म्हातारी मेल्याचे दुःख नाही पण काळ सोकावतो, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

 


About Author

Arundhati Gadale

Other Latest News