मुंबई – सध्या राज्याच्या राजकारणात दोन ठाकरे बंधू एकत्र येण्यावरुन बरीच राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे. उबाठा आणि मनसेमध्ये साद प्रतिसाद नाटक सुरु आहे. मात्र उबाठा गटाकडून यापूर्वी वारंवार मनसेबाबत विखारी टीका करण्यात आली. उबाठा पक्षाचे अस्तित्व संपल्याने आता त्यांना राज ठाकरेंची गरज भासत आहे, अशी घणाघाती टीका शिवसेना प्रवक्ते आणि उपनेते संजय निरुपम यांनी आज केली. निरुपम यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते.
तुमचा महाराष्ट्राशी संबंध काय?
दरम्यान, संजय राऊत यांनी तुमचा महाराष्ट्राशी संबंध काय? या प्रश्नावर निरुपम म्हणाले की, माझे आयुष्य महाराष्ट्रात गेले. मी लोकसभेत काँग्रेस पक्षाचा खासदार होतो. कोरोनात गरिबांसाठी वाटलेल्या खिचडीमध्ये तुम्ही घोटाळा केला. तुमचे लहान भाऊ आणि मुलीच्या नावे कंत्राट घेतले. गोरेगावातील मराठी माणसांना बिल्डर बनून तुम्ही घोटाळा केला आणि त्यांना बेघर केले. तुम्ही तुरुंगात गेलात. महाराष्ट्रासाठी तुम्ही काही केलं नाही. संजय राऊत म्हणजे घोटाळा करणारा, पैसे खाणारा माणूस आहे, मी विचारतो तुमचा महाराष्ट्राशी संबध काय आहे? असा प्रतिप्रश्न संजय निरुपम यांनी विचारत संजय राऊतांवर टिकास्त्र डागले.

उबाठाकडून मनसेवर सातत्याने टीका…
उबाठाने सातत्याने मनसेवर टीका करत आहे. याची यादीच निरुपम यांनी वाचून दाखवली. मनसे ही भाजपची बी टीम नाही तर ढ टीम आहे, अशी टीका केली होती. तसेच मनसे नव्हे तर गुनसे म्हणजे गुजरात नवनिर्माण सेना आहे, असे म्हटले होते. राज ठाकरे भाडोत्री वक्तव्य करतात. जेव्हा भाजपला गरज असते तेव्हा ते अचानक जागे होतात. आणि भाजपच्या ताटाखालचे मांजर बनतात, असे उद्धव ठाकरे म्हणाले होते. आदित्य ठाकरेनेही राज ठाकरेंवर टीका केली होती. आदित्य ठाकरे यांनी मनसेला संपलेला पक्ष अशी उपमा दिली होती, मनसे टाईमपास पार्टी आहे. अशी टीका उबाठा गटाने मनसेवर केली होती. आता उबाठाचे अस्तित्व संपलेले आहे, म्हणून आता ते मनसेला साद घालत आहेत. अशी टीका निरुपम यांनी ठाकरे गटावर केली.