कोल्हापूर : इंद्रजित सावंत यांना धमकी दिल्या प्रकरणी अटकेत असलेल्या प्रशांत कोरटकरला अखरे कोल्हापूर कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. तीन अटींचे पालन करण्याच्या आश्वासनावर कोर्टाने जामीनाला मंजूर दिली. 50 हजाराचा जातमुचलका, तपासासाठी सहकार्य करत पोलिस जेव्हा जेव्हा बोलवतील तेव्हा राजवाडा पोलिस ठाण्यात हजर राहणे आणि साक्षीदारांना न धमकावणे या तीन अटी कोर्टाकडून कोरटकरला घालण्यात आल्या आहेत.
कोरटकरला पोलिस संरक्षण देण्याची मागणी
प्रशांत कोरटकर याला कोल्हापूर पोलिसांनी अटक करून आणले त्यावेळी त्यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाला होता. तसेच न्यायालयामध्ये आणताना देखील हल्ला झाला होता. त्यामुळे दोनवेळा हल्ल्याचा प्रयत्न झाल्याने कोरटकरला नागपूरमध्ये त्याच्या घरी पोलिस संरक्षण द्यावे, अशी मागणी त्याच्या वकिलाकडून करण्यात आली आहे.

तेलंगणातून अटक
प्रशांत कोरटकर याच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर तो सातत्याने पोलिसांना चकवा देत होता. तो परदेशात पळून गेल्याच्या देखील चर्चा होत्या. मात्र, पोलिसांनी त्याचा माग काढत तेलंगणा राज्यातून त्याला अटक केली. तेलंगणामध्ये त्याला जाण्यासाठी ज्या व्यक्तींनी मदत केली त्यांचा देखील तपास पोलिसांनी केला आहे.
कोरटकरचा जेलमधील मुक्काम वाढला
कोरटकला जामीन मंजूर झाला असला तरी त्याला आणखी दोन दिवस कळंब जेलमध्येच काढावे लागणार आहेत. जामीनदार ज्या कोर्टासमोर हजर करून जामीन मिळवला जातो ते कोर्टाचे प्रमोशन झाल्याने सध्या तेथे कोणी नाही. त्यामुळे दोन दिवसांमध्ये तेथे चार्ज घेतल्यानंतर कोरटकरी जेलमधून सुटका करण्यात येईल.
कोण आहे प्रशांत कोरटकर?
शिवाजी महाराजांचा अवमान करणारा तसेच इंद्रजित सावंत यांना धमकी देणार प्रशांत कोरटकर हा पत्रकार आहे. सोशल मीडियावर सक्रिय असून वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्यासोबत त्याचे अनेक फोटो आहेत. तो मुळचा माहुरचा असून त्याचे शिक्षण हिंगणघाट येथे झाले आहे. विदर्भ माझा या युट्यूब चॅनलचा संपादक देखील आहे.