मुंबई – राज्यात इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीची करण्याचा निर्णय घेतलाय.. यावर राज्यभरातून लोकांची टीका होत आहे. याचे पडसाद राज्यभर उमटत दिसत आहेत. दरम्यान, आता यावरुन शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारवर, मोदी-शहा, मुख्यमंत्री आणि राज ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. तसेच मोदी-शहांना इंग्रजी येत नाही म्हणून ते आमच्यावर हिंदी लादत आहेत, अशी टीका राऊतांनी केली आहे.
पालिका निवडणुकीसाठी चाललेलं नाटक…
दरम्यान, पुढे बोलतना राऊत म्हणाले की, महाराष्ट्राच्या निर्मितीत भाजपाचे काहीही योगदान नाही. हिंदी भाषेचं प्रेम आहे. पण आमच्यावर लादू नका. भाजपा किंवा त्यांच्या नेत्यांना मराठी किंवा हिंदी भाषेवर प्रेम नाही. हे केवळ पालिका निवडणुकीसाठी चाललेलं पडद्यामागून नाटक आहे. अशी टिका खासदार संजय राऊत यांनी केली. भाजपाची लोकं हिंदी लादत आहेत. महाराष्ट्रात मराठी ही आमची राजभाषा आहे. आणि तिचा सन्मान हा झालाच पाहिजे. मराठी भाषा अजूनही राज्यात काही ठिकाणी सक्तीची केली नाही. का केली नाही? असा सवाल खासदार संजय राऊतांनी उपस्थित करत राज्य सरकारवर टिका केली.

भूमिका किती वेळा बदलणार…
ते बाळासाहेबांची कॉपी करतात. ठाकरे हे हिंदू असणार नाहीतर कोण असणार. प्रत्येक वेळा तुम्ही भूमिका बदलता, त्यामुळं तुम्ही किती वेळा कपडे बदलणार, आम्ही हिंदी नाही तर हिंदू आहोत, असं मनसेनं म्हटलं आहे. ते कधी हिंदू झाले? कुठून तरी आलेलं स्क्रिप्ट वाचतात. ते कधी हिंदू, कधी बिंदू, कधी सिंधू असतात. काय ते एकदा ठरवा. असा टोला संजय राऊत यांनी मनसेला लगावला. देशाची भाषा आहे. तुम्ही आम्हाला काय हिंदी शिकवणार आम्ही यूपी, बिहारवाल्यांना हिंदी शकवू, आमचे चांगले हिंदी आहे. एकनाथ शिंदेंना तर हिंदीचे क्लासेस लावावे लागतील.
आम्ही यूपी बिहारवाल्यांना हिंदी शिकवू…
भैय्याजी जोशी घाटकोपरमध्ये येऊन बोलले की, इथले भाषा गुजराती आहे. त्यावर कोणी बोलले नाही. आधी मराठी भाषा सक्तीची करा… आणि हिंमत असेल तर इंटरनॅशनल शाळांमध्ये मराठी सक्तीची करा, असे आव्हान राऊतांनी सरकारला दिले. मराठीविषयीचं भलंमोठं ट्विट सागर बंगल्यावरुन आलं असावं म्हणून हे उद्योग सुरु झालेत. बेळगावात मराठी भाषिकांवर अत्याचार सुरु आहेत. आणि इथे हिंदी भाषा सक्तीची केली जात आहे.
हिंदी ही महाराष्ट्राच्या मातीत…
दरम्यान, हा महाराष्ट्र आहे येथे मराठीच चालणार, मराठी भाषेचा सन्मान हा झालाच पाहिजे, हिंदी ह्या देशात राहणार आहे. हिंदी सिनेमा, नाटक आणि साहित्य हे महाराष्ट्राच्या मातीत आहे. हे केवळ सुपारीचे धंदे सुरु आहे, अशी टिका संजय राऊतांनी सरकारवर केली. आणि कोणत्याही भाषेचा महाराष्ट्रावर बलात्कार होणार नाही. हिंदी आमच्यावर लादू नका, ती आम्हाला कोणी शिकविण्याचे गरज नाही. आम्हाला शिकवू नका… हिंदी ही भाषा गुजरातला शिकविण्याची गरज आहे, असं राऊत म्हणाले.