मुंबई : लहानपणापासून शिवसेनेची वाटचाल बघत आलो आहे, त्यावेळी शिवसैनिक आंदोलन करत असे तर पोलीस शिवसैनिकांना धमकी देत हे सगळं बंद कर…काँग्रेसमध्ये ये नाही तर टाडा लावतो. आताही तीच परिस्थिती आहे. आता पोलिसांचा वापर टोळीतील लोकांसारखा होतोय. आणि पक्ष फोडाफोडी केली जातेय, अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर केली आहे. ‘मी पाहिलेला तीन दशकातील थरार ‘ जेष्ठ पत्रकार प्रभाकर पवार यांनी लिहिलेल्या पुस्तक प्रकाशन सोहळा शुक्रवारी मुंबई मराठी पत्रकार संघात पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक-पद्मश्री मधु मंगेश, शिवसेना खासदार संजय राऊत, माजी खासदार-पद्मश्री कुमार केतकर, खासदार अरविंद सावंत आदी उपस्थित होते.
तर पोलीस चमत्कार करू शकतात…
सत्ताधाऱ्यांकडून जुनी प्रकरणे उखडून काढली जात आहेत. समोरील पक्ष हे संपवण्याचे काम केलं जात आहे. आपण कुठे चाललो आहोत? आपण फक्त जातोय, याचा शेवट काय होणार आहे? मी मुख्यमंत्री असताना एक गोष्ट माझ्या लक्षात आली की, जर पोलिसांना फ्री हॅन्ड दिला तर, पोलीस चमत्कार करू शकतात. मुंबई आणि महाराष्ट्राच्या पोलिसांवर तेव्हा ही माझा विश्वास होता आणि आजही आहे. मात्र फ्री हॅन्ड न देता तुम्ही नको तिथे पोलिसांचा बंदोबस्त लावता. ज्यांना गरज नाही त्यांना संरक्षण दिल, ज्यांना टिपायला पाहिजे, ते मोकळे फिरतायत. गेले दोन दिवस पाण्यासाठी आपण जे आंदोलन केलं, तिथे आंदोलनं होऊ नयेत म्हणून तिथे पोलीस बंदोबस्त होता. आपण समाजासाठी जे काम करतोय त्यासाठी पोलीस आहेत. पण पाण्याचं आंदोलनं होऊ नये म्हणून पोलिसांचा वापर राज्यकर्ते करणार असतील तर मग पोलिसांनी काय करायचं?, असा उलट सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.

समाजाने न्याय मागायचा कोणाकडे?
प्रभाकर पवार आपलं पुस्तक चाळत असताना कोणा कोणाचे कसे संबंध आहे, कसे असू शकतात, हे कल्पनेच्या पलीकडले आहे. या पुस्तकाचे सहज एक पान मी उलगडले आणि वाचले तर छोटा शकील आणि न्यायाधीशांचे तुम्ही संभाषण लिहिले आहे. एखादा गुंड थेट न्यायाधीशांना सांगतो की, ये मेरा काम कर के दो. म्हणजेच त्याला वसुली करायची होती. असे जर का संबंध असतील तर, कर्णिक यांनी सांगितल्याप्रमाणे समाजाने न्याय मागायचा कोणाकडे? हा इथून प्रश्न सुरु होतो, असेही ते म्हणाले.