तुमच्या मुलांच्या दप्तरात काय? नाशिकमधील विद्यार्थ्यांची दप्तरं उघडली अन् शिक्षक हादरले!

विद्यार्थ्यांच्या दप्तराचं सरप्राइज चेकिंग केलं, तेव्हा हा सर्व प्रकार उघड झाला. त्यामुळे शिक्षकांच्या कारवाईचं कौतुक केलं जात आहे.

नाशिक : चाकू, लोखंडी साखळ्या, फायटर, सायकलच्या चैन, कडी आणि कंडोम. हे सगळं कुणा गुन्हेगाराकडे नाही तर शाळेतल्या विद्यार्थ्यांच्या दप्तरात सापडलंय. नाशिक जिल्ह्यात इगतपुरीमध्ये एका खासगी शाळेत शिक्षकांनी मुलांच्या दप्तरांचं सरप्राईज चेकिंग केलं. त्यात हे धक्कादायक वास्तव समोर आलंय.

मुलांच्या दप्तरातल्या या वस्तू पाहून शिक्षकच सरप्राईज झालेत. शाळेत येणाऱ्या मुलांकडे हत्यारं कशी असा सवाल उपस्थित झाला. शिक्षकांनी ही बाब गांभीर्यानं घेतली आणि पालकांना बोलावणं पाठवलं. मुलांच्या पालकांसमोर या विद्यार्थ्यांना चांगलीच समज देण्यात आली आहे.

काय काय सापडलं मुलांच्या दप्तरात?

शिक्षकांनी जेव्हा आठवी आणि नववीच्या विद्यार्थ्यांच्या दप्तरांचं सरप्राईज चेकिंग केलं. तेव्हा विद्यार्थीही सुरुवातीला गडबडले. मात्र शिक्षकांनी प्रत्येक विद्यार्थ्याला दप्तर पूर्ण रिकामं करायला सांगितलं. या दप्तरांत कल्पनेपलीकडच्या वस्तू शिक्षकांना सापडल्या.

  • अनेक मुलांच्या दप्तरात वेगवेगळ्या पद्धतीची लोखंड, पितळ्याची हातातली कडी होती
  • काही मुलांच्या दप्तरात चाकू सापडले
  • काही मुलांच्या दप्तरात फायटर, सायकलच्या चेनसारख्या मारहाणीसाठी लागणारी शस्त्रही सापडली
  • काही मुलांच्या दप्तरात तर चक्क कंडोम सापडले आहेत.
  • गुटखा, तंबाखूच्या पुड्या – या शाळेतल्या विद्यार्थ्यांपैकी अनेकांनी त्यांचे केसही वाढवले होते. संतापलेल्या शिक्षकांनी दप्तरातली शस्त्र जप्त केलीच, त्याचबरोबर केस वाढलेल्या मुलांचे केस कापून त्यांना धडाही शिकवला

काय म्हणाले शाळेचे उपमुख्याध्यापक?

शाळेचे उपमुख्याध्यापक विवेक पगारे म्हणाले की, गुन्हेगारी प्रवृत्तीला साजेशा वस्तू या विद्यार्थ्यांकडे सापडलेल्या आहेत. उद्या ही मुलं गुन्हेगार होऊ नयेत यासाठी त्यांचं समुपदेशन शाळेच्या वतीनं करण्यात आलंय. पालकांनाही याची जाणीव करुन देण्यात आली. अशी वागणूक ठेवली तर उद्या या विद्यार्थ्यांना पोलीस स्टेशनमध्ये जावे लागेल याची जाणीव विद्यार्थ्यांना करुन दिलीय.

शाळेच्या कारवाईचं स्वागत

इगतपुरीच्या शाळेतील शिक्षकांनी उचललेल्या या पावलाचं शिक्षणाधिकारी आणि पालक संघटनांकडून कौतुक करण्यात येतंय. या शाळेतील शिक्षकांनी केलेल्या सरप्राईझ दप्त चेकिंगचं शिक्षणाधिकारी निलेश पाटील यांनी समर्थन केलंय. या शिक्षकांचं अभिनंदन करताना इतर शाळांतील शिक्षकांनीही विद्यार्थ्यांची दप्तरं तपासावीत असं आवाहनही त्यांनी केलंय. पालकांनीही या शिक्षकांच्या कृत्याचं कौतुक करत यामुळं विद्यार्थ्यांना धडा मिळाल्याचं म्हटलंय.

माहितीच्या भडीमारात विद्यार्थी नेमकं काय घेतायेत, हे या घटनेनं स्पष्ट झालंय. गुन्हेगारी आणि विलासी प्रवृत्तींकडे विद्यार्थी वळू लागलेत का, असा सवाल यातून निर्माण होतोय. शिक्षक आणि पालकांनी यासारखी योग्य पावलं उचलून त्यांची ही वाट बदलण्याची गरज आहे.


About Author

Smita Gangurde

Other Latest News