मुंबई – नाशिक शहरातील अतिक्रमण हटवताना महापालिका कर्मचाऱ्यांचे संरक्षण करताना कर्तव्यावर असलेल्या पोलिसांवर समाजकंटकांकडून दगडफेक करण्यात आली होती. या दगडफेकीत ३१ हून अधिक पोलीस अधिकारी जखमी झाले आहेत. या जखमी पोलिसांवर नाशिक शहरातील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
गृहराज्यमंत्र्यांनी फोनवरुन साधला संवाद…
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी या जखमी पोलिसांशी फोनवरून संवाद साधत त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. यावेळी कर्तव्यावर असणाऱ्या पोलिसांना त्यांनी धीर देत, प्रतिकूल परिस्थितीत कर्तव्य बजावल्याबद्दल अभिनंदनही केलं. दुखापत झालेले सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन जाधव आणि संदीप मिटके यांच्या तब्येतीबाबतही गृहराज्यमंत्र्यांनी विशेष विचारणा केली.

पोलिसांना आवश्यक ती मदत मिळवी…
दरम्यान, हॉस्पिटलमधील डॉक्टरांशीही गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी फोनवरून चर्चा करुन सर्व जखमी पोलिसांना आवश्यक ती मदत त्वरित मिळावेत, असे निर्देशही दिले. तसेच या प्रकरणाती जे कोणी समाजकंटक असतील किंवा दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारही गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी यावेळी दिला.