Mumbai Mega Block : मुंबईची रेल्वे लोकल ही मुंबईकरांची जीवनवाहिनी समजली जाते. दररोज लाखो मुंबईकर या रेल्वे लोकलमधून प्रवास करतात. या रेल्वे लोकलबाबत एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. मुंबईकरांनो, रविवारी सुट्टीच्या दिवशी जर तुम्ही रेल्वेने प्रवास करणार असाल तर थांबा आणि ही बातमी वाचा, नाहीतर मध्येच तुम्ही अडकू शकता. रविवारी सुट्टीचा दिवस असल्यामुळं रविवारी रेल्वेकडून विविध अभियांत्रिकी आणि रेल्वेच्या देखभालीची कामे करण्यासाठी मेगा ब्लॉक घेण्यात येतो. दरम्यान, मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर रविवार (13 एप्रिल) रोजी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळं रेल्वेच्या वेळापत्रकावर नक्की एक नजर मारा.
मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक कुठे?
दरम्यान, मध्य रेल्वेवर सकाळी 10.55 ते दुपारी 3.35 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार स्थानकादरम्यान अप तसेच डाऊन धीम्या मार्गावर सकाळी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. सीएसएमटी स्थाकातून सकाळी 10.48 ते दुपारी 3.32 पर्यंत सुटणाऱ्या डाऊन-धीम्या मार्गावरील गाड्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि विद्याविहार स्थानकांदरम्यान डाऊन-जलद मार्गावर वळविल्या जाणार आहेत. ह्या गाड्या भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला स्थानकांवर थांबतील. तिथून पुढे विद्याविहार स्थानकावर डाऊन धीम्या मार्गावर वळवल्या जातील. ब्लॉक दरम्यान मस्जिद, सँडहर्स्ट रोड, चिंचपोकळी आणि करी रोड या रेल्वे स्थानकांवर उपनगरीय रेल्वे सेवा थांबणार नाहीत.

हार्बर रेल्वेवर मेगा ब्लॉक कुठे?
हार्बर मार्गावर कुर्ला आणि वाशी या रेल्वे स्थानकावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. कुर्ला आणि वाशी अप आणि डाऊन हार्बर मार्गावर 11.10 ते 4.10 पर्यंत ब्लॉक असणार आहे. दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी 10.34 ते दुपारी 3.36 पर्यंत पनवेल, बेलापूर, वाशी येथे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर दुसरीकडे पनवेल, बेलापूर आणि वाशी रेल्वे स्थानक ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पर्यंतच्या अप हार्बर मार्गावरील गाड्या सकाळी 10.16 ते दुपारी 3.47 पर्यंत बंद असणार आहेत. दुसरीकडे ब्लॉकच्या काळात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कुर्ला आणि पनवेल ते वाशी दरम्यान विशेष गाड्यांची सेवा सुरु राहणार आहेत. हा मेगा ब्लॉक रेल्वेच्या पायाभूत सुविधांची देखभाल तसेच प्रवासांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक आहे. ब्लॉकदरम्यान, प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केली आहे.