मुंबई – उद्धव आणि राज ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाची चर्चा तर सुरु झालीय खरी, मात्र मनसेच्या नेत्यांकडूनच याबाबत शंका उपस्थित करण्यात येत आहे. राज ठाकरेंचं वक्तव्य व्यापक स्वरुपात होतं, ते निवडणुकांपुरतं मर्यादित करण्यात येत असल्याचा आक्षेप संदीप देशपांडेंनी घेतलाय. आधी मुद्द्यांवर एकत्र येऊ आणि नंतर निवडणुकांबाबत युतीचा विचार करता येईल, असं सांगत तूर्तास मनोमिलन होणार का, यावर त्यांनी शंका उपस्थित केलीय. उद्धव ठाकरेंच्या अटी-शर्तींवरही प्रश्न मनसे नेत्यांकडून उपस्थित करण्यात येत आहेत. दुसरीकडे वाद घालू नका, असं सांगत ठाकरेंच्या शिवसेनेकडून महाराष्ट्र हितासाठी ही भूमिका योग्य असल्याचं सांगण्यात येतंय.
राज आणि उद्धव ठाकरेंच्या एकत्र येण्याबाबतच्या विधानांनंतर शिवसैनिकांत उत्साह पसरलेला पाहायला मिळतोय. मुंबईत गिरगावात ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याचं स्वागत करण्याचे फोटो झळकले. इतकंच नाही तर ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यातही ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाचे बॅनर्सही झळकले.

मनसे नेत्यांत साशंकता
राजकारणात घडणाऱ्या या नव्या घडामोडींनी उत्साह संचारलेला असतानाच, मनसे नेते मात्र या युतीबाबत साशंक पाहायला मिळतायेत. राज ठाकरेंचं वक्तव्य व्यापक स्वरुपातलं होतं, ते निवडणुकांशी जोडणं चुकीचं असल्याचं संदीप देशपांडे म्हणालेत. तर अशी अभद्र युती नको, अशी भूमिका अमेय खोपकर यांनी सोशल मीडियावर पोस्ट करुन मांडलीय. अटीशर्तींवरील युतीबाबत मनसे नेते प्रकाश महाजन यांनीही प्रश्न उपस्थित केलेत.
संजय राऊत काय म्हणाले?
मनसे नेत्यांच्या या आक्षेपांना ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी उत्तर दिलंय. कोणतीही अट नसल्याचं सांगत वाद घालू नका, असं राऊत म्हणाले आहेत. काही जणांना दोन्ही ठआकरे बंधू एकत्र यावेत असं वाटत नाही, असं सांगत आत्ताच यावर वाद घालू नका, यातून महाराष्ट्र हिताची काळजी न करणाऱ्यांचं फोफावेल असं राऊत म्हणालेत. या मनोमिलनाच्या चर्चेनं एकनाथ शिंदेंचा संताप मान्य आहे, मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना आनंद झाला असेल असंही राऊत म्हणालेत.
मनोमिलन मुद्द्यांसाठी की निवडणुकांसाठी?
आता ठाकरे बंधूंचं मनोमिलन मुंबई महापालिका निवडणुकीसाठीसाठी होईल की महाराष्ट्रातील मराठी मुद्द्यांसाठी होईल, याची चर्चा रंगलीय. पहिलीपासून हिंदी या मुद्द्यावर ठाकरेंची शिवसेना आणि मनसे यांचं एकमत आहे. अशा मुद्द्यांवर आधी एकत्र येऊन मग युतीची चर्चा होण्याची शक्यता आहे. मनसेनं हिंदीवर आक्रमक पवित्रा घेत थेट सरसंघचालकांनाच पत्र पाठवलंय. हिंदीसारख्या मराठी माणसांच्या मुद्द्यांवर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येतात का हे भविष्यात पाहावं लागणार आहे.
युतीची सर्वाधिक गरज कुणाला?
मुंबई महापालिकेसाठी युतीची सर्वाधिक गरज ही ठाकरेंच्या शिवसेनेला दिसतेय. राज ठाकरेंकडे भाजपा आणि शिंदेंच्या शिवसेनेसोबत जाण्याबाबतचही पर्याय आहेत. राज ठाकरे सत्तेत नसले तरी भाजपा आणि शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यांशी त्यांचे चांगले संबंध आहेत.
महेश मांजरेकरांना दिलेल्या मुलाखतीत यावरही त्यांनी भाष्य करत, भाजपासोबत युतीची शक्यता नाकारलेली नाही. भाजपाची वैचारिक पातळीवर काही ठिकाणी मतभेद असल्याचंही त्यांनी सांगितलंय. मात्र भाजपाशी युती करणार नाही, असंही त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं नाही. बदलत्या राजकारणात गरजेप्रमाणे पावलं पडतील असं राज म्हणालेत.
राज ठाकरेंची अडचण ?
राज ठाकरेंनी महाराष्ट्र हितासाठी छोटे वाद बाजूला ठेवण्याचं वक्तव्य केल्यानंतर, उद्धव ठाकरेंनी तातडीनं दिलेल्या प्रतिसादानं राज ठाकरेंची अडचण तर झाली नाहीये ना, अशीही चर्चा सुरुये.
राज ठाकरेंसमोरचे पर्याय
1. भाजपासोबत मुंबई महापालिकेसाठी गेल्यास थेट सत्तेत सहभागी होण्याची शक्यता
2. शिंदेंच्या शिवसेनेची युतीचा पर्याय, मात्र सत्तेत मर्यादित वाटा मिळेल
3. ठाकरेंच्या शिवसेनेसोबत गेल्यास दीर्घकालीन फायदा, मात्र सत्तेपासून दूर राहावे लागेल.
मनोमिलनाच्या या चर्चेनं राज ठाकरेंची महायुतीत तर उद्धव ठाकरेंची मविआत बार्गेनिंग पॉवर मात्र वाढलीय. ठाकरे बंधूंचं हे मनोमीलन आता वास्तवात उतरतं की पुन्हा फक्त चर्चेपुरतचं राहतं, हे येत्या काळात पाहावं लागणार आहे. काही दिवसांत मनोमिलनाची केवळ चर्चाच राहिली हे समोर येण्याची शक्यता नाकारता येणारी नाही