कोल्हापूर – जर एखाद्यं ध्येय गाठण्यासाठी तुमच्याकडे दुर्दम्य इच्छाशक्ती आणि विलक्षण आवड असेल, याच्या जोडीला कठोर परिश्रम आणि अहोरात्र मेहनत यात सातत्य असेल तर कोणत्याही ध्येयाला गवसणी घालता येते. किंवा यश आपल्यापासून लांब राहू शकत नाही. याच गोष्टीचा प्रत्यय कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील यमगे या गावी आला आहे. बिरदेव ढोणे या पट्ट्याने कठोर परिश्रम आणि मेहनत करत आयपीएस अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे. वडिलोपार्जित मेंढपाळाचा व्यवसाय करत अहोरात्र अभ्यास करून त्याने हे यश संपादन केले… यशाला गवसणी घातली आहे. एक मेंढपाळाचा मुलगा आयपीएस अधिकारी झाल्यामुळे त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत असून, सर्व स्तरातून त्याचे अभिनंदन केले जात आहे.
मेंढरं चारत असताना आनंदवार्ता…
दरम्यान, बिरदेव ढोणे याला शाळेत असल्यापासूनच अभ्यासाची आवड होती. दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत मुरगूड केंद्रात पहिला नंबर त्याने पटकावला होता. त्यानंतर त्याने पुण्यात उच्च शिक्षण पूर्ण केले. अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगून त्यांनी दिल्ली गाठली. येथे प्रचंड मेहनत, चिकाटी, जिद्द याच्या जोरावर अभ्यास करत परीक्षा दिली. आणि आयपीएस अधिकारी झाला. जेव्हा मंगळवारी निकाल जाहीर झाला तेव्हा बिरदेव बेळगावजवळील एका धनगर वाड्याजवळ मेंढरं चारत होता. ही आनंदवार्ता गावात पोचली तेव्हा संपूर्ण धनगरवाडा आनंदाने नाहून गेला. मेंढपाळाच्या पोरांनं आकाशाला गवसणी घालत यश मिळवल्याने संपूर्ण परिसर परिसरात आनंद झाला. तसेच बिरदेवसह त्याच्या आई-वडिलांनाही आनंद अश्रू अनावर झाले.

संपूर्ण देशात 551 वी रँक मंगळवारी…
निकाल जाहीर झाला तेव्हा बिरदेव बेळगावजवळ एका धनगर वाड्याजवळ मेंढरं चारत होता. परंतु बिरदेवच्या मित्राने फोन करून निकालाची वार्ता सांगितली. यावेळी बिरदेवला 551 वी रँक मिळाली. निकाल ऐकून बिरदेव आणि कुटुंबाला आनंद गगनात मावेनास झाला. कागल तालुक्यातील यमगे या गावात सिद्धाप्पा ढोणे हे पारंपारिक आणि वडिलोपार्जित मेंढपाळाचा व्यवसाय करतात. आपल्या पोरांना चांगले शिक्षण घ्यावं… मोठं व्हावं… अधिकारी व्हावं हे बिरदेवच्या वडिलांचं स्वप्न होतं. आणि कठोर मेहनत आणि परिश्रम करून बिरदेव याने आपल्या आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण केलं. बिरदेव यूपीएससीची मागील चार वर्षापासून मेहनत करत होता. तयारी करत होता. त्याने सातत्याने आपला प्रयत्न चालू ठेवला. आणि केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत देशात 551 वी रँक मिळवली.
बिरदेव समाजापुढे आदर्श…
बिरदेवने भारतीय पोलीस सेवेत आयपीएस अधिकारी होण्याचं स्वप्न पूर्ण केलं. त्याच्या यशानंतर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. आणि दुसरीकडे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही जर तुमची इच्छाशक्ती, आवड आणि मेहनत करण्याची तयारी असेल तर तुम्ही यशाला प्रादाक्रांत करू शकता. हे बिरदेवने आपल्या यशातून दाखवून दिले आहे. बिरदेवने हा समाजापुढे आदर्श ठेवला आहे. गाव-खेड्यातील, ग्रामीण भागातील नवीन मुलांसाठी बिरदेवचा संघर्ष कथा नक्कीच प्रेरणादायी ठरेल यात शंका नाही.