रायगड जिल्ह्यात पावसाचे धुमशान; जगबुडीला नदीला पूर…प्रशासन अलर्ट

रायगड जिल्ह्यात दोन दिवसांपासून पावसाचे धुमशान सुरू आहे. जगबुडी नदीला पूर आल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. प्रशासन अलर्ट मोडवर आहे.

रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसाचा जोर वाढत आहे. हवामान विभागाने आज रायगड जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जाहीर केला असून, पुढील काही तासांमध्ये पावसाचा जोर अधिक वाढण्याचा इशाराही दिला आहे. त्यामुळे आज प्रशासनाकडून सर्व शाळांना देखील सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.  रोहा तालुक्यातील कुंडलिका नदी आणि खालापूरमधील पाताळगंगा नदी यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून, नागोठणे येथील आंबा नदीने इशारा पातळी गाठली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन सतर्क झाले असून, आपत्ती व्यवस्थापन पथकांनाही सज्ज ठेवण्यात आले आहे.

जगबुडी नदीला पूर

खेडमध्ये जगबुडी नदीचे पाणी मटण मार्केटमध्ये शिरण्यास सुरुवात झाली आहे. पुढील काही तास पावसाचा जोर कायम राहिल्यास मुख्य मार्केटमध्येही पावसाचे पाणी शिरु शकते. या परिस्थितीवर स्थानिक प्रशासन सातत्याने लक्ष ठेवून आहे. खेड नगरपरिषद प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मुसळधार पावसामुळे जगबुडी आणि नारंगी या दोन नद्यांना पूर आला आहे. त्यामुळे खेड शहरातील अंतर्गत रस्ते पाण्याखाली गेले आहेत. परिणामी येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे.

शाळा, महाविद्यालयांना सुट्टी

प्रशासनाकडून सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. रायगड जिल्ह्यातील अलिबाग, रोहा, तळा, महाड, पोलादपूर या तालुक्यातील सर्व माध्यमाच्या शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. रोहा तालुक्यातील कुंडलिका नदी आणि खालापूरमधील पाताळगंगा नदी यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून, नागोठणे येथील आंबा नदीने इशारा पातळीच्या वर वाहत आहे.

नागरिकांना सतर्कतेच्या सूचना

जिल्ह्याला आज ऑरेंज अलर्ट असल्यामुळे किनारपट्टी भागातील मच्छीमार आणि स्थानिक नागरिकांना घरीच राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ही सगळी परिस्थिती पाहता जिल्हा प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापन पथकांना सज्ज ठेवले आहे. पाली खोपोली रोडवर नदीचे पाणी आल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. या मार्गावरील उन्हेरे फाटा येथील पुलाजवळ दोन्ही बाजूस नदीचे पाणी शिरल्याने येथील मुख्य पुलावरून पाणी जाण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून दोन्ही बाजूची वाहतूक बॅरेगेटिंग करुन बंद करण्यात आली आहे.


About Author

Rohit Shinde

Other Latest News