मुंबई : भाजपाच्या राज्यात मंदिर तोडले जात असताना सरकार मात्र मूग गिळून गप्प बसते ही लाजीरवाणे आहे. मंदिर पाडण्यास एकीकडे न्यायालय स्थगिती देत असताना दुसरीकडे महापालिकेचे अधिकारी मंदिर पाडतात, हे शासनाचे अपयश आहे. जैन मंदिर पाडून भाजपा सरकारने जैन बांधवांच्या भावना पायदळी तुडवल्या आहेत, असा गंभीर आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी जमीनदोस्त केलेल्या विलेपार्लेतील जैन मंदिर परिसराला भेट देऊन जैन बांधवांकडून संपूर्ण प्रकरणाची माहिती घेतली. जैन मंदिरात स्त्री पुरुष आराधना करत असताना तथाकथित महाराज आणून मंदिरातील मूर्ती काढून घेतल्या, यावेळी काही मूर्तींची तोडफोड झाली. राज्यात धार्मिक स्थळांवर कारवाईची शृंखला सुरु असताना जैन मंदिरही यात आले असून सरकार हे जाणीवपूर्वक करत आहे का? असा सवाल सपकाळ यांनी विचारला.

भाजपवर प्रहार
भाजपा सरकार संस्कृती बुडवायला निघाले आहे, पण मंदिर पाडणे खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा सपकाळ यांनी दिला. मंदिर पाडले जात असताना जैन बांधवांनी शांतता पाळली. महात्मा गांधी यांच्या सत्य व अहिंसेच्या मार्गाने मंदिराचे सत्य घेऊन पुढे जाऊ असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.
‘त्या’ अधिकाऱ्याची बदली
मंदिर पाडल्याची कारवाई करणाऱ्या के प्रभागाचे प्रभारी नवनाथ घाडगे यांची बदली करण्यात आली. महापालिका आयुक्त भूषण गगरानी यांनी हे आदेश दिले होते. तर, मंदिर पाडण्यामागे भाजप असून यासाठी मराठी अधिकाऱ्याचा बळी दिल्याची टीका संजय राऊत यांनी केली होती.