मुंबई – लालपरी अर्थात एसटी आज ही ग्रामीण भागातील गाव-खेड्यात लोकांचे दळणवळणाचे मुख्य साधन मानले जाते. परंतु हीच एसटी मागील काही दिवसांपासून तोट्यात, डबघाईत असल्याचे बोलले जाते. एसटीचे अनेक प्रश्न आणि समस्या आहेत. दरम्यान गेल्या आठवड्यात एसटी कर्मचाऱ्यांना केवळ 56% पगार दिला होता. यावरून एसटी कर्मचारी आणि एसटी कर्मचारी संघटना यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. यानंतर परिवहन मंत्री यांनी यावर तोडगा काढत, एसटी कर्मचाऱ्यांचा मंगळवारपर्यंत शंभर टक्के पगार दिला जाईल. असे आश्वासन दिलं होतं. यानंतर एसटी कर्मचाऱ्यांचा उर्वरित 44% पगार आज खात्यात जमा झाला आहे.
120 कोटी निधी मंजूर…
दरम्यान, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी वित्त विभागाचे मुख्य सचिव यांची मंत्रालयात भेट घेऊन 120 कोटी रुपयांचा निधी मंजूर करुन घेतला होता. हा निधी एसटी कर्मचाऱ्यांच्या उर्वरित पगारासाठी मंजूर करण्यात आला होता. शुक्रवारी 120 कोटी रुपये शासनाने महामंडळाला दिले होते. परंतु शनिवार, रविवार आणि सोमवारी सलग तीन दिवस सुट्टी आल्यामुळे खात्यात पगार देता नव्हता. यानंतर एसटी कर्मचाऱ्यांच्या खात्यात आज मंगळवारी उर्वरित 44% पगार जमा झाला आहे. पगार आल्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे.

अन्यथा आंदोलनाचा इशारा…
गेल्या आठवड्यात एसटी कर्मचाऱ्यांना केवळ 56% पगार आल्यामुळे राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया आल्या होत्या. एसटी कर्मचाऱ्यांनी याबाबत रोष व्यक्त केला होता. मोफत योजनामधून सरकार पैशांचे वाटप करत आहे. यासाठी सरकारकडे पैसे द्यायला आहेत. परंतु आम्ही लोकांची सेवा करतो… आमच्या मेहनतीचे पगाराचे पैसे द्यायला सरकारकडे निधी नसल्याचा टीका एसटी कर्मचारी आणि संघटनाने केली होती. यानंतर शुक्रवारी एसटी कर्मचारी संघटना आणि सरकार यांच्यात बैठक झाली होती. आणि या बैठकीतून लवकरच तोडगा काढला जाईल, असं आश्वासन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलं होतं. तर तोडगा नाही निघाला तर आंदोलनाचा इशारा एसटी कर्मचाऱ्यांनी दिला होता.