मुंबई – महायुती सरकारमध्ये शिंदेंच्या शिवसेनेला डावललं जात असल्याची तक्रार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांच्याकडे केल्याचं सांगण्यात येतंय. अनेक माध्यमांनी याबाबत वृत्तांकन केलेलं आहे. राज्याचं अर्थखातं हे अजित पवार यांच्याकडे असल्यानं राष्ट्रवादीला झुकतं माप मिळत असल्याची तक्रारही शिंदेंनी शाहांकडे केल्याचं सांगण्यात येतंय. निधिवाटपात शिंदेंच्या शिवसेनेच्या मंत्र्यांना डावललं जात असल्याचंही शिंदेंनी शाहांसमोर मांडलं. यावर सुप्त संघर्ष न ठेवता समन्वय साधण्याच्या सूचना अमित शाहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना दिल्याचीही चर्चा आहे.
गेल्या दोन ते तीन दिवसांत एसटी कर्मचाऱ्यांच्या पगाराचा मुद्दा, रायगडच्या पालकमंत्रिपदाच्या वादाची चर्चा होती. याबाबत एकनाथ शिंदे यांनी काही बाबी अमित शाहा यांच्या कानावर घातल्याचं सांगण्यात येतंय. शुक्रवारी रात्री अमित शाहा पुण्यात आल्यानंतर, एकनाथ शिंदे यांनी त्यांची रात्री भेट घालून महायुतीत होणारा दुजाभाव त्यांच्या कानावर घातल्याचं सांगण्यात येतंय.

शिंदे नाराज आहेत का?
मुख्यमंत्रिपद न मिळाल्यानं एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा गेल्या अनेक महिन्यांपासून आहे. त्यातच नाशिक आणि रायगडचे पालकमंत्रिपद शिंदेंच्या शिवसेनेला न मिळाल्यानंही नाराजी असल्याचं सांगण्यात येतंय. एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाची लेखी हमी गेल्या वर्षी संपावेळी सरकारनं देऊनही, निधीची तरतूद न केल्यानं पगार रखडल्याची तक्रार शिंदेंनी केल्याचं सांगण्यात येतंय. अर्थखात्याशी संबंधित अधिक तक्रारी असल्याचंही सांगण्यात येतंय.
अमित शाहा यांनी शिंदेंच्या या आक्षेपांबाबत रायगडहून परतल्यावंर मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा केल्याचं सांगण्यात येतंय.
अजित पवार काय म्हणाले?
अमित शाहा दिल्लीला रवाना झाल्यानंतर याबाबत अजित पवार यांना विचारणा केली असता त्यांनी शिंदेंनी अशी कोणतीही तक्रार केली नसेल, असं सांगितलंय.
अजित पवार म्हणाले की, याबाबत अमित शाहा आपल्याशी काहीही बोललेले नाहीत. हे सूत्रांच्या माहितीनुसार सांगणं बंद करा. सकाळपासून ते रात्री शाहा विमानानं टेक ऑफ करेपर्यंत तिघेही शाहांच्या सोबत होतो. एकनाथ शिंदेंना काही सांगायचं असेल तर ते थेट आम्हाला सांगू शकतात, आमचे संबंध चांगले आहेत. त्यामुळं ते शाहांकडे तक्रार करतील असं आपल्याला अजितबात वाटत नाही. जर काही असेल तर ते थेट मुख्यमंत्री आणि आपल्याशी बोलतील. सरकारच्या वेगवेगळ्या निर्णयांसाठी दर आठवड्याला तिन्ही नेते एकत्र भेटतात, असं सांगत अजित पवारांनी या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केलाय.