मुंबई : विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्यात दुरावा दिसला. अमित ठाकरे यांच्या विरोधात एकनाथ शिंदेंनी आपले उमेदवार सदा सरवणकर यांना माघार घेण्यास सांगितले नाही. त्यामुळे राज ठाकरे शिंदेंवर नाराज असल्याच्या चर्चा होत्या. अमित ठाकरेंचा या निवडणुकीत पराभव झाला. मात्र, आज (रविवारी) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या निवासस्थान शिवतीर्थवर स्नेहभोजनासाठी आले आहेत.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिंदे यांना आपल्या निवासस्थानी स्नेह भोजनासाठी शिंदेंना आमंत्रित केले होते.यावेळी सोबत उद्योग मंत्री उदय सामंत, मनसे नेते अमित ठाकरे, मनसेचे मुंबई शहराध्यक्ष संदीप देशपांडे, अमेय खोपकर, अभिजित पानसे हे देखील उपस्थित होते.

राज ठाकरे आणि एकनाथ शिंदेंची ही भेट स्नेहभोजनासाठी असली तरी यातून महापालिकेच्या निवडणुकीत नवीन समीकरणे दिसून येतील का? याची चर्चा सुरू झाली आहे.
वेगवेगळ्या कारणाने शिवसेनेचे नेते, मंत्री उदय सामंत हे आधीच राज ठाकरेंना यांना भेटले होते. एकनाथ शिंदेंच्या भेटीवेळी देखील ते उपस्थित होते. त्यांनी सांगितले की, मी कुर्ल्यातील एका कार्यक्रमात होतो साहेब भेटण्यासाठी येत आहेत असा निरोप देत तातडीने मला बोलवून घेण्यात आले.
उद्धव ठाकरेंना आव्हान?
विधानसभेत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला दारुण पराभव स्वीकारावा लागला. या पराभवाने ते बॅकफूटवर आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी मुंबई महापालिकेची निवडणुकीत ही अस्तित्वाची लढाई आहे. उद्धव ठाकरेंनी पुन्हा उचल खाऊ नये यासाठी शिंदे-राज ठाकरेंची युती होण्याची शक्यता देखील राजकीय वर्तुळात आहे.
मिशन मुंबई महापालिका
आगामी महापालिका निवडणुकी महाविकास आघाडीच्या दृष्टिने महत्त्वाच्या असणार आहेत. विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या पराभवानंतर महाविकास आघाडीसाठी विशेषता उद्धव ठाकरेंसाठी मुंबई महापालिका जिंकणे महत्त्वाचे झाले आहे. दिवाळींतर महापालिका निवडणुकी होण्याची शक्यता आहे ते गृहीत धरून भाजपने देखील तयारी सुरू केली आहे. स्थानिक स्वराज संस्था निवडणूक स्वबळावर लढण्याचे भाजप नेते सांगत आहेत. त्यामुळे मुंबई महापालिकेत महायुतीसोबत भाजप लढणार की स्वबळावर हे अजून स्पष्ट झालेले नाही.