उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा एकदा रमले शेतीत; आपल्या मूळ दरे गावातल्या शेतात यंदा केली आवाकाडोची लागवड

आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असलेल्या आवाकाडो फळाची लागवड करून हा प्रयोग यशस्वी झाल्यास स्थानिक शेतकऱ्यांनाही पर्यायी जोड पीक म्हणून आवाकाडोची लागवड करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल.

सातारा  : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शेतीवरील प्रेम सर्वश्रृत आहे. त्यांना वेळ मिळेल तसे ते गावी जाऊन शेती करतात. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या सातारा जिल्ह्यातील आपल्या मूळ दरे या गावी गेले आहेत. दरवर्षी आपल्या गावी गेल्यावर ते आपल्या सहकाऱ्यांसोबत एका तरी नव्या झाडाची लागवड करतात. यापूर्वी स्ट्रॉबेरी, हळद, चिक्कू आणि बांबूची लागवड केल्यानंतर यंदा पहिल्यांदाच आवाकाडो या परदेशी फळाची लागवड करण्याचा निर्णय त्यांनी घेतला.

आवाकाडोची यशस्वी लागवड होईल…

दरम्यान, सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील कोयना नदीच्या पट्ट्यातील दरे गावचा परिसरातील माती ही अत्यंत सुपीक असून, त्यात कोणतेही पीक घेतले तरी ते उत्तमरीत्या येते असे उपमुख्यमंत्री शिंदे अनेकदा बोलताना सांगतात. त्यामुळे इथे केलेला आवाकाडो लागवडीचा हा प्रयत्न नक्की यशस्वी होईल याची त्यांना खात्री वाटते आहे. तसे झाल्यास स्ट्रॉबेरी, ब्लु-बेरी अशा बेरीवर्गीय वनस्पतींची लागवड करणाऱ्या या पट्यात शेतकऱ्यांना आवाकाडो लागवडीतून नवीन नगदी उत्पन्न देणारे आणखी एक पीक सापडेल, असा त्याना विश्वास आहे. त्यामुळेच हा प्रयोग यशस्वी करण्याचा प्रयत्न त्यांनी आपल्या शेतात केला आहे.

हातात फावडे आणि झारी…

दुसरीकडे एकनाथ शिंदेंनी यांनी रविवारी पुन्हा एकदा शेतीत रमल्याचे चित्र दिसले आहे. त्यांनी स्वतः हातात फावडे आणि झारी घेत आवाकाडोचे झाडांची लागवड केली. यावेळी त्यांना या झांडांना मातीत लावले, त्यांना पाणी घातले. दरम्यान, आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असलेल्या आवाकाडो फळाची लागवड करून हा प्रयोग यशस्वी झाल्यास स्थानिक शेतकऱ्यांनाही पर्यायी जोड पीक म्हणून आवाकाडोची लागवड करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल. यासाठी त्यांनी स्वतःच्या शेतात हा प्रयोग केला आहे. यावेळी त्यांच्यासोबत दरे गावातील ग्रामस्थ आणि शिंदे यांचे सर्व सहकारी आवर्जून उपस्थित होते. सध्या शिंदेंनी केलेली या झाडांची लागवड हा व्हीडिओ मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.


About Author

Astha Sutar

Other Latest News