एसटीत आता तिसरा डोळा तुमच्यावर नजर ठेवणार; सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्वाचं पाऊल!

एसटी महामंडळाच्या नव्या बसेस मध्ये महिलांच्या सुरक्षेसाठी खास ब्लाइंड स्पॉट कॅमेरे बसविण्यात आले आहेत. यामुळे हे कॅमेरे 360 अंशातून आता सर्वांच्या हालचालीवर बारीक लक्ष ठेवणार आहेत.

राज्यात एसटी महामंडळाच्या बसेसने प्रवास करणाऱ्या महिलांची संख्या मोठी आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक एसटीच्या गाड्यांमध्ये अनेक आमुलाग्र बदल करत आहेत. आता महामंडळाच्या नव्या बसेस मध्ये महिलांच्या सुरक्षेसाठी खास ब्लाइंड स्पॉट कॅमेरे बसविण्यात आले आहेत. यामुळे हे कॅमेरे लक्ष ठेवणार आहेत. त्यामुळे एसटीच्या येणाऱ्या नवीन बसेस प्रवासासाठी अधिक सुरक्षित असतील असे मत उपमुख्यमंत्री  एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. ते ठाण्यात एआय तंत्रज्ञानावर आधारित सुरक्षा प्रणाली बसवलेल्या स्मार्ट एसटी बसेसची पाहणी करताना बोलत होते.

महिलांची सुरक्षितता अधिक वाढणार

संबंधित एकात्मिक सुरक्षा प्रणालीची पाहणी केल्यानंतर उपमुख्यमंत्री शिंदे  म्हणाले की, सध्या दररोज सरासरी 55 लाख प्रवाशांना दळणवळण सेवा देणारी एसटी भविष्यात अधिक सुरक्षित झाली पाहिजे, या उद्देशाने एआय तंत्रज्ञानावर आधारित ” एकात्मिक सुरक्षा प्रणाली ” नव्या बसेस ना बसविण्यात येणार आहे. चालकाच्या बस चालवण्याच्या पद्धतीपासून बसमध्ये बसलेल्या प्रवाशांच्या हालचालीवर देखरेख करणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेरा बरोबरच मनोरंजनासाठी वायफाय, जाहिरात प्रसारासाठी एलईडी स्क्रीन, तसेच जीपीएस प्रणाली सह फोम बेस आग प्रतिबंधक प्रणाली देखील बसविण्यात येणार आहे.

प्रताप सरनाईकांचा पुढाकार

या स्मार्ट बसेस बनवण्यासाठी एसटी महामंडळाचे अध्यक्ष आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे आग्रही होते. त्यांच्या सातत्य पुर्ण प्रयत्नांचे कौतुक करावं तितकेच थोडंच आहे असेही एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले. कारण त्यांनी भविष्याचा विचार करून  एसटीमध्ये आमुलाग्र बदल करण्याचा ध्यास घेतला आहे. त्यांच्या प्रयत्नाला महाराष्ट्र शासनाची योग्य ती साथ लाभेल याची मी यावेळी ग्वाही देतो असे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

महाराष्ट्र एसटी बस सेवा ग्रामीण आणि शहरी भागांना जोडणारे महत्त्वाचे साधन आहे. महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी एसटी महामंडळाने विविध उपाययोजना केल्या आहेत. महिला कंडक्टरांची नेमणूक, सीसीटीव्ही कॅमेरे, जीपीएस प्रणाली आणि रात्रीच्या वेळेस विशेष महिला बस सेवा अशा सुविधा उपलब्ध आहेत. काही बसस्थानकांवर महिला विश्रांतीगृहांची व्यवस्था करण्यात आली आहे. पोलिसांशी समन्वय ठेवून आपत्कालीन परिस्थितीत त्वरित मदत मिळावी यासाठी हेल्पलाइन क्रमांकही सुरू करण्यात आला आहे. महिलांनी निर्भयपणे प्रवास करावा आणि सुरक्षितता अनुभवावी, हा या उपाययोजनांचा मुख्य उद्देश आहे. अशा प्रकारे एसटी सेवा महिला सुरक्षिततेच्या दृष्टीने सकारात्मक पावले उचलत आहे.


About Author

Rohit Shinde

Other Latest News