पुणे: ग्रामविकास मंत्री भाजपाचे आमदार जयकुमार गोरे आपल्या बेधडक स्वभावासाठी ओळखले जातात. भाजपचे कॅबिनेट मंत्री जयकुमार गोरे यांनी मविआतील आमदाराला अप्रत्यक्षपणे भाजपमध्ये सामील होण्याचे आवाहन केले आहे. तशी ऑफरच गोरेंनी दिलीयं. “बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या” अशा शब्दांत त्यांनी हे खुल ऑफर दिली. हे वक्तव्य आता राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे.
ठाकरेंचे आमदार बाबाजी काळेंना ऑफर
पुण्याच्या खेड, आंबेगाव आणि शिरूर तालुक्यातील 36 दुष्काळग्रस्त गावांतील पाणीटंचाई दूर करण्यासाठी पाणी परिषदेची बैठक घेण्यात आली. त्यावेळी माण-खटावचे भाजप आमदार आणि कॅबिनेट मंत्री जयकुमार गोरे यांनी खेडचे उबाठा गटाचे आमदार बाबाजी काळे यांना अप्रत्यक्षरित्या पक्ष बदलाचा सल्ला दिला. आता अशा शासकीय बैठकीत गोरेंनी थेट राजकीय ऑफर दिल्याने चर्चांना उधाण आले आहे.

ठाकरेंच्या शिवसेनेला बाभळीची उपमा
या निमित्ताने गोरेंनी ठाकरेंच्या शिवसेनेला बाभळीची उपमा दिली आहे. विधानसभा निवडणुकांपासून सुरू झालेले पक्षबदलांचे सत्र अद्यापही कायम असून विविध पक्षात इनकमिंग-आऊटगोईंग वेगाने सुरू आहे. महायुतीतील प्रमुख पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिवसेना ( शिंदे गट) यांच्या पक्षात मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरू असल्याचे चित्र गेल्या अनेक महिन्यांपासून दिसत आहे.
काय म्हणाले गोरे?
“लोक आपल्या निवडून देतात तेंव्हा त्यांना आपल्याकडून प्रचंड अपेक्षा असतात. आणि त्या पूर्ण केल्या नाही तर लोक दुसरे कोणाचा तरी शोधत राहतात, त्यामुळे लोक कधीही बाभळीच्या झाडाखाली उभी रहात नाहीत. लोक आंब्याच्या झाडाची सावली पाहतात आणि आंबे कुठे मिळतात हेच शोधतात. त्यामुळे तुम्ही आंब्याच्या झाडाकडे या आणि पाण्याचा प्रश्न सोडवा,” अशा शब्दांत गोरे यांनी शिवसेनेचे बाबाजी काळे यांना भाजपात येण्याची खुली ऑफर दिली.
मात्र एकीकडे पाणीटंचाईचा प्रश्न सोडवण्यासाठी आयोजित बैठकीत जयकुमार गोरेंनी राजकीय ऑफर दिली. त्यामुळे त्यांच्यावर काही प्रमाणात टीका देखील होत आहे, असे असले तरी बाबाजी काळेंना ही ऑफर मान्य नसल्याची माहिती आहे.