मुंबई – बाळासाहेबांच्या नावाने अमित शहांनी बनावट शिवसेना स्थापन केली आहे. शहांनी शिंदेंची बनावट संघटना तयार केली आहे. तुम्ही धर्मवीर दोन चित्रपट काढून धर्मवीर आनंद दिघेंच्या नावाने बनावट विचार पसरवले, हे चालते का? असा सवाल उपस्थि करत खासदार संजय राऊत यांनी शिंदे गट आणि केद्रीय गृहमंत्री अमित शहांवर जोरदार निशणा साधला. आज त्यांनी माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.
दिघेंच्या नावाने तुम्ही बनावट विचार पसरवले…
ज्या उद्धव ठाकरेंचे बाळासाहेब वडील होते. ज्यांनी शिवसेनेची स्थापना केली आहे. त्यांचा आवाज वापरला आहे. अमित शहांचा नाही… आम्ही जर तुमच्या पक्षाची स्थापना केलेल्या अमित शहांवर काही केले तर चुकीचे होते. पण आम्ही शिवसेनाप्रमुखांच्या आवाजात भाषण वापरले यात तुमच्या पोटात दुखायचे कारण काय? असा हल्लाबोल संजय राऊत यांनी शिंदे गटावर केला. बाळासाहेबांच्या विचारांवर शिंदेंचा अधिकार होत नाही. शिंदेंनी धर्मवारी चित्रपट काढला. हा चित्रपट आम्ही पाहिला नाही. पण त्यांच्या नावाने बनावट संवाद, सर्व काही बनावट तयार केले. तुमच्यापेक्षा आम्ही आनंद दिघेंच्या जवळ होतो. आमचे राजन विचारे अधिक जवळ होते. हे तुम्ही सर्व बनावट आणले त्यावर बोला.

फडणवीसांची चाकरी करा, अन्यथा बाहेर पडा…
दरम्यान, एकनाथ शिंदेंना आणि त्यांच्या पक्षाला अमित शहांनी तंबी दिली आहे. एकतर फडणवीसांची चाकरी करा, अन्यथा सरकारमधून बाहेर पडा… तुमच्याशिवाय हे सरकार चालेल. त्यामुळं भाजपाची भांडी घासू, चाकरी करु पण बाहेर पडता येणार नाही. तशी यांची अवस्था झाली आहे. त्यामुळं त्यांनी आम्हाला शिकवू नये. असा टोला संजय राऊतांनी शंभूराज देसाईंना लगावला. तसेच बाळासाहेबांच्या आवाजावरुन मंत्री शंभूराज देसाईंनी टिका केली आहे, असं राऊत यांना विचारले असता, बेडकासारखे काँग्रेसमधून आलेले शंभूराज देसाई हे आम्हाला विचारधारा शिकवणार का? एवढे वाईट दिवस आमचे आले नाहीत. आनंद दिघे, बाळासाहेब ठाकरे हे आता शंभूराज देसाई आम्हाला शिकवणार का? गद्दारांना क्षमा नाही. हे सगळे भरकटलेले आहेत.
गुजरातचा पॅटर्न महाराष्ट्रात राबवला जातोय…
मंत्री गिरीश महाजन खटल्यात अडकून पडलेत, त्यांचं मानसिक संतुलन बिघडलं आहे. त्यामुळं महाजनांना ऐकायला कमी येत आहे. असा टोला राऊतांनी महाजनांना लगावला. मालवणमधील शिवरायांच्या पुतळा कोसळल्यानंतर आता तिथे नवीन पुतळ्याचे काम 80 टक्के पूर्ण झालेय, यावर बोलताना राऊत म्हणाले की, मग पूर्वी मालवणमधील शिवरायांच्या पुतळा का कोसळला? या पुतळ्याचा कामात मोठा घोटाळा झालेला आहे. गुजरातचा पॅटर्न महाराष्ट्रात राबवला जातोय, परंतू गुजरातमध्ये महाराष्ट्र पॅटर्न चालणार का? असा सवाल राऊतांनी उपस्थित केला.